सांगली : महाराष्ट्रात गेल्या चार दशकात उसाखालील क्षेत्रात सातत्याने वाढ झाली आहे. मात्र, देशातील प्रमुख राज्यांत हेक्टरी ऊस उत्पादकतेत महाराष्ट्र देशात आठव्या स्थानी आहे. प्रती हेक्टरी उत्पादनातील घटीचा हा परिणाम एकूण साखर उत्पादनारही दिसून येत आहे. दैनिक ‘पुढारी’मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, राज्यात २०२३- २४ वर्षीच्या तुलनेत २४-२५ या वर्षात अडीच लाख हेक्टरहून अधिक क्षेत्रात घट झाली. २३-२४ मध्ये राज्यात उसाचे क्षेत्र १४ लाख ३७ हजार हेक्टर होते. हेच क्षेत्र घटून २४-२५ मध्ये ११ लाख ६७ हजार हेक्टर झाले.
देशातील राज्यनिहाय उत्पादकतेचा विचार केला, तर ऊस उत्पादक प्रमुख १४ राज्यांत तामिळनाडू अग्रस्थानी आहे. २०२२-२३ मध्ये तामिळनाडूत हेक्टरी उत्पादकता उच्चांकी म्हणजे १०४.७८ टन आहे. त्याखालोखाल कर्नाटकमध्ये ९० टन प्रतिहेक्टर उत्पादकता आहे.महाराष्ट्रात १९६०-६१ मध्ये १ लाख ५५ हजार हेक्टर ऊस होता, तर अवघे १,४०,०४,००० टन उत्पादन होताना प्रतिहेक्टरी उसाची उत्पादकता ६७ टन होती. राज्यात ८०-८१ मध्ये २ लाख ५८ हजार हेक्टर ऊस होता. तर १,४४,३३,००० टन उसाचे उत्पादन झाले होते. हेक्टरी उत्पादकता ९२ टन होती. ९०-९१ मध्ये हेच आकडे अनुक्रमे ४,४२,००,००० हेक्टर, ३,८१,५४,००० टन आणि ८६ टन असे होते. अलीकडे पाहिले, तर २०२२- २३ मध्ये राज्यात १४ लाख ८८ हजार हेक्टर ऊसक्षेत्र होते, तर १३,५७,५४ हजार टन उसाचे उत्पादन होताना हेक्टरी उत्पादकता ९१ टन राहिली. २३-२४ च्या हंगामात राज्यात १,४३,७० हजार हेक्टर ऊस होता. एकूण उत्पादन ११,१२,६२,७०० टन झाले होते. उसाची हेक्टरी उत्पादकता घटून जेमतेम ७८ टन राहिली.