कोल्हापूर:सहकार व्यवस्थापन संस्थेच्यावतीने राज्यातील सहकारी साखर कारखान्यांच्या कार्यकारी संचालकांच्या पॅनेल नियुक्तीसाठी घेण्यात आलेल्या परीक्षेतून ७४ जणांची तोंडी परीक्षेसाठी निवड करण्यात आली आहे.यापैकी ५० जणांची पॅनेलवर नियुक्ती होईल.गेले नऊ ते दहा वर्षे राज्यातील सहकारी साखर कारखान्याच्या कार्यकारी संचालक पदाची परीक्षा घेऊन तालिका तयार न केल्याने अनेक कारखान्यांकडे प्रभारी कार्यकारी संचालकच काम करत आहेत.याबाबत साखर उद्योगातील अधिकाऱ्यांकडून या परीक्षेबाबत सातत्याने विचारणा होत होती.
कार्यकारी संचालक पदासाठी गेल्यावर्षी, ३० जून २०२३ अखेर अर्ज मागविण्यात आले होते.यापैकी १९० जणांना वगळण्यात आले.त्यापैकी ३७ जणांनी उच्च न्यायालयात दाद मागितली होती.त्यामुळे निवड प्रक्रिया लांबली.न्यायालयाने संबंधीतांना परीक्षेची परवानगी दिली.आता या परीक्षेचा निकाल एक वर्षानंतर लागला आहे.२४७ पैकी ७४ जण उत्तीर्ण झाले आहेत. त्याची तोंडी परीक्षा घेऊन ५० जणांची यादी तयार केली जाईल.पात्र उमेदवारांची यादी जाहीर झाली असून १८, १९ आणि २२ जुलै रोजी मुलाखती होणार आहेत.