पुणे : राज्याच्या साखर आयुक्तपदाचा पदभार सिद्धराम सालिमठ यांनी सोमवारी (दि. ३) सायंकाळी स्वीकारला आहे. यंदाचा ऊस गाळप हंगाम २०२४-२५ आता शेवटच्या टप्प्याकडे झुकलेला असताना शेतकऱ्यांना कारखान्यांकडून देय असलेली उसाची रास्त आणि किफायतशीर किंमत तथा एफआरपी रक्कम देणे बाकी आहे. तसेच, बऱ्याच दिवसांपासून रखडलेली ऊसदर नियंत्रण मंडळाची बैठक घेणे यांसारख्या प्रलंबित कामांचा निपटारा वेगाने होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी राहिलेले सालिमठ यांची साखर आयुक्तपदाच्या बदलीचे आदेश शासनाने १८ फेब्रुवारी रोजी काढले होते आणि नवीन पदाचा कार्यभार त्वरित स्वीकारावा, असे म्हटले होते. दरम्यान, मावळते साखर आयुक्त डॉ. कुणाल खेमनार हे बदली ठिकाणी रुजू झाल्याने सहकार आयुक्त दीपक तावरे यांच्याकडे अतिरिक्त पदभार दिला होता. आता पूर्णवेळ साखर आयुक्त मिळाल्यामुळे साखर उद्योगाच्या दृष्टीने ही बाब योग्य झाली आहे.
साखर उद्योगाशी संबंधित चालू घडामोडी आणि अपडेट्स जाणून घेण्यासाठी वाचत रहा चिनीमंडी.