मुंबई : राज्यात सद्यस्थितीत पावसासाठी हवामान पोषक असले तरी, मान्सून काहीसा कमजोर झाल्याची स्थिती आहे. आज, बुधवारी कोकणात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा, तर उर्वरित राज्यात हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. तर विदर्भात विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. राज्यात ऊन-सावल्यांचा खेळ राहील असे हवामानाशास्त्र विभागाचे म्हणणे आहे.
‘ॲग्रोवन’मध्ये प्रसिद्ध वृत्तानुसार, राज्यात ढगाळ हवामान राहण्याची शक्यता असून दिवसभर ऊन-सावल्यांचा खेळ सुरू राहील, अशी शक्यता आहे. सद्यस्थितीत तुरळक ठिकाणी एखादी दुसरी सर येताना दिते. आज (ता. २३) विदर्भात विजांसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर कोकणात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. उर्वरित राज्यात हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
दरम्यान, मॉन्सूनचा कमी दाबाचा पट्टा काहीसा उत्तरेकडे सरकला आहे. उत्तर तमिळनाडू आणि रायलसीमा भागात चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. मध्य प्रदेशाच्या मध्य भागात समुद्रसपाटीपासून ३.१ ते ४.५ किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत. दक्षिण कर्नाटक पासून कोमोरिन भागापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे.