पुणे : साखर आयुक्तालयाच्या आकडेवारीनुसार, राज्यात यंदाच्या गळीत हंगामात आजअखेरपर्यंत एकूण ३४०.४३ लाख मेट्रिक टन उसाचे गाळप झाले आहे. तर एकूण २९३.८१ लाख क्विंटल साखर उत्पादन झाले आहे. यंदाच्या सरासरी उताऱ्यात ०.५७ टक्क्यांनी घट झाली आहे. पुणे विभागाने सर्वाधिक ७७.२१ लाख मेट्रिक टन उसाचे गाळप केले आहे. गेल्यावर्षीच्या समान कालावधीच्या तुलनेत यंदा राज्यात ७६.७८ लाख टन उसाचे गाळप कमी झाले आहे. साखर उत्पादनही ९० लाख १० हजार क्विंटलने कमी झाले आहे.
राज्यात गेल्यावर्षी आजअखेर ३८३.९१ लाख क्विंटल साखर उत्पादन झाले होते. गेल्यावर्षी आजच्या तारखेपर्यंत एकूण ४१७.२१ लाख मेट्रिक टन उसाचे गाळप पूर्ण झाले होते. यंदा १९४ साखर कारखाने उसाचे गाळप करीत आहेत. यामध्ये ९५ सहकारी आणि ९९ खासगी साखर कारखान्यांचा समावेश आहे. यंदा साखर उताऱ्यातही घट झाली असून, राज्याचा सध्याचा उतारा हा ८.६३ टक्के इतका आहे. गतवर्षी हाच साखर उतारा हा ९.२० टक्के होता. यावरुन राज्याचा साखर उतारा ०.५७ टक्क्यांनी घटल्याचे दिसून येत आहे. साखर आयुक्तालयाच्या म्हणण्यानुसार, कोल्हापूर विभागाने साखर उताऱ्याच्या टक्केवारीत आघाडी घेतली असून, येथील साखर उताऱ्याची टक्केवारी राज्यात सर्वाधिक ९.८३ टक्के इतकी आहे.