पुणे : राज्याचे साखर आयुक्त डॉ. कुणाल खेमनार यांची राज्य सरकारने बदली केली आहे. त्यांची मुंबईत ‘महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळा’च्या (एमआयडीसी) रिक्त असलेल्या सहव्यवस्थापकीय संचालकपदी मंगळवारी (दि.११) नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे वर्षभराच्या आत पुन्हा नवीन साखर आयुक्त येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. राज्याच्या अपर मुख्य सचिव (सेवा) व्ही. राधा यांनी जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे की, खेमनार यांनी आपल्या सध्याच्या पदाचा कार्यभार प्रधान सचिव (सहकार व पणन) यांच्या सल्ल्याने अन्य अधिकाऱ्याकडे सोपवून नवीन पदाचा कार्यभार त्वरित स्वीकारावा.
राज्याच्या साखर उद्योगासाठी साखर आयुक्तालय हे महत्त्वाचे पद असून, कायदेशीर नियंत्रणाचे कामकाज करते. वार्षिक सुमारे एक लाख कोटी रुपयांची उलाढाल साखर उद्योग आणि निगडित उद्योगाच्या माध्यमातून दरवषी होते. त्यासाठी सहकारी व खासगी मिळून २०० साखर कारखान्यांचा सरासरी हंगाम चालतो. साखर उद्योगाशी निगडित सर्वच विषय हे आयुक्तालयांकडून सोडविले जातात. त्यामुळे सलग तीन वर्षे पूर्णपणे साखर आयुक्त मिळणे, ही या उद्योगासाठी महत्त्वाची बाब आहे. मात्र, अलीकडे एका वर्षाच्या आत साखर आयुक्तांची बदली होत असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झालेले आहे.
साखर उद्योगाशी संबंधित चालू घडामोडी आणि अपडेट्स जाणून घेण्यासाठी वाचत रहा चिनीमंडी.