महाराष्ट्र स्टेट शुगर फॅक्टरी मॅनेजिंग डायरेक्टर्स असोसिएशनतर्फे कार्यकारी संचालकांवरील हल्ल्याचा निषेध, कारवाईची मागणी

पुणे : महाराष्ट्र स्टेट शुगर फॅक्टरी मॅनेजिंग डायरेक्टर्स असोसिएशनने राजाराम सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक प्रकाश चिटणीस यांच्यावरील हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध केला आहे. तसेच राज्याचे साखर आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्याकडे निवेदनाद्वारे संबधितांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. कारवाई न झाल्यास सर्व कार्यकारी संचालक काम बंद आंदोलन करून साखर आयुक्त कार्यालयासमोर न्याय मागण्यासाठी उपोषण करतील, असा असा इशारा देण्यात आला आहे.

साखर आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे कि, महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वच सहकारी साखर कारखान्यामध्ये कार्यरत असणारे कार्यकारी संचालक हे राज्य शासनाच्या पॅनेल वरील नियुक्त झालेले कार्यकारी संचालक असून हे पद अत्यंत महत्त्वाचे व सन्मानाचे समजले जाते. कारखान्यामधील हजारो कर्मचारी, हजारो तोडणी वाहतूकदार, हजारों ऊस उत्पादक शेतकरी, शेकडो मालपुरवठादार व्यापारी तसेच कारखानदारीवर अवलंबून असणारे अनेक छोटे-मोठे उद्योगधंदे चालवणारे हजारो व्यवसायिक तसेच कारखाना व्यवस्थापन व शासन यांच्यामधील महत्त्वपूर्ण दुवा म्हणून कार्यकारी संचालक आपले कार्य करीत असतात.

परंतु अलीकडील काळामध्ये कार्यकारी संचालक या पदास कोणतेही संरक्षण नसल्यामुळे अत्यंत निंदनीय अशा घटना घडत आहेत. यामध्ये कार्यकारी संचालक यांना शिवीगाळ करणे, ब्लॅकमेलिंग करणे, दमदाटी करणे, मारहाण करणे अशा अनेक घटना घडत आहेत. मंगळवारी (दि.2) छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखानाचे कार्यकारी संचालक प्रकाश चिटणीस यांना अमानुषपणे मारहाण करण्यात आलेली आहे. यामध्ये घटनेमागे राजकीय कारण असल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट होत आहे. अशा स्वरूपाने राजकीय सुडापोटी कार्यकारी संचालक यांना मारहाण करणे ही बाब खेदजनक व निंदनीय आहे.

निवेदनात पुढे म्हटले आहे कि, महाराष्ट्र राज्य कार्यकारी संचालक असोसिएशनमार्फत या घटनेचा आम्ही तीव्र निषेध करीत आहे. याबाबत आपण संबंधितावर तत्काळ कारवाई करण्याच्या सूचना देणे आवश्यक आहे. अन्यथा सर्व कार्यकारी संचालक ज्यांनी आजपर्यंत कधीही कसलाही संप, आंदोलन केले नाही त्यांना काम बंद आंदोलन करून आपल्या कार्यालयासमोर न्याय मागण्यासाठी उपोषण करावे लागेल, असेही निवेदनात म्हटले आहे.

या घटनेबाबत सत्वर चोकशी करून दोषीवर कारवाई करण्याकरीता योग्य तो पूर्तता करावी व कार्यकारी संचालक यांना अशा बाबतीत संरक्षण देणे करिता कायदेशीर तरतूद करावी, अशी मागणीही निवेदनात करण्यात आली आहे. निवेदनावर असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र रणवरे, उपाध्यक्ष डॉ. यशवंत कुलकर्णी आणि सेक्रेटरी संजीव देसाई यांच्या सह्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here