महाराष्ट्र : ऊसतोडणी यंत्र खरेदीसाठी ३२१ कोटींचे अनुदान उपलब्ध

पुणे : साखर आयुक्तालयाने ऊस तोडणी यंत्र खरेदी अनुदानासाठी काढण्यात आलेल्या सोडतीमधील ३३० लाभार्थ्यांना तोडणी यंत्र खरेदी करण्यासाठी पूर्वसंमती दिली आहे. यंदा महाराष्ट्रासाठी विशेष बाब म्हणून केंद्र सरकारने मोठी मदत केलेली आहे. राष्ट्रीय कृषी विकास योजनेतील (आरकेव्हीवाय) इतर पात्र लाभार्थ्यांच्या अर्जांची छाननी करून त्यांना पूर्वसंमती देण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. आरकेव्हीवाय अंतर्गत २०२२-२३ व २०२३-२४ या दोन वर्षांतील ९०० ऊसतोडणी यंत्र खरेदीचा निर्णय शासनाने घेतला आहे.

महाडीबीटी पोर्टलवर १६ जानेवारी २०२४ रोजी ४५३ ऊसतोडणी यंत्रांसाठी प्रथम सोडत काढण्यात आली. सोडतीत निवड झालेल्या ४५३ अर्जदारांपैकी २८७ अर्जदारांनी आवश्यक कागदपत्रे दिलेल्या मुदतीत पोर्टलवर अपलोड केली. त्यानंतर १६ फेब्रुवारी रोजी १५७ ऊस तोडणी यंत्रांकरिता दुसऱ्या टप्प्यात सोडत काढण्यात आली. या सोडतीतील अर्ज वगळून उर्वरित ४९ ऊसतोडणी यंत्रांसाठी १ मार्च २०२४ रोजी सोडत काढण्यात आल्याचे सांगण्यात आले. पहिल्या वर्षी ४५० ऊसतोडणी यंत्रांची खरेदी होईल. योजनेसाठी केंद्राचे १९२.७८ कोटी आणि राज्य सरकारचे १२८.५२ कोटी मिळून एकूण ३२१ कोटी रुपयांचे अनुदान उपलब्ध करून देण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here