बीड : विधानसभा निवडणुकीत बीडमध्ये भाजप आणि पंकजा मुंडे यांना ऊसतोड कामगार संघटनांनी थेट आव्हान दिले आहे. ऊसतोड कामगारांच्या नऊ संघटनांनी विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची तयारी केली आहे. यासाठी संघटनांनी बैठक बोलावली होती. या बैठकीतून राज्यातील सहा जागेवर दावा करण्यात आला. मात्र, नंतर पाच जागा लढविण्याची घोषणा करण्यात आली. राज्यामध्ये २२ लाख ऊसतोड कामगार आहेत. फक्त बीड जिल्ह्यात चार लाख ८५ हजार मजूर आहे. त्यांचे नेतृत्व पूर्वी दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या माध्यमातून केले जात होते. त्यानंतर पंकजा मुंडे यांनी ऊसतोड कामगारांचे नेतृत्व केले. परंतु आता सत्तेत वाटा मिळावा म्हणून ऊसतोड कामगार संघटनांनी बंड पुकारात राज्यातील पाच जागांवर दावा केला आहे.
बीड, आष्टी, चाळीसगाव, कन्नड आणि माजलगाव या मतदारसंघात उमेदवार उभे केले जाणार आहे. याबाबत महायुती आणि महाविकास आघाडीकडे बोलणी झाली असून यांच्याकडून उमेदवारी न मिळाल्यास या मतदारसंघात अपक्ष लढण्याची तयारी ऊसतोड कामगार संघटनांनी केली आहे. राज्यात विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. महाविकास आघाडीकडून बीडमध्ये संदीप क्षीरसागर, केजमध्ये अंजली घाडगे, परळीत राजेभाऊ फड, आष्टीमध्ये मेहबूब शेख आणि माजलगावमध्ये रमेश आडसकर हे उमेदवार आहेत. तर बीड जिल्ह्यात महायुतीकडून दोन जागेवर भाजप उमेदवार असतील आणि चार जागेवर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमेदवार असतील.