कोल्हापूर : गेल्या खरीप हंगामात कमी पाऊस झाल्याने ऊस वाढीला मोठा फटका बसला. त्यामुळे राज्यात यावर्षी ऊस उत्पादनात तब्बल २० लाख टनांची घट झाली आहे. मात्र, या हंगामात साखर उतारा गेल्यावर्षीच्या तुलनेत ०.२० टक्के (१०.१७ टक्के) वाढला आहे. त्यापासून १०३९.८७ लाख क्विंटल साखर उत्पादन झाले आहे. ऊस उत्पादन घटूनही गेल्यावर्षीच्या तुलनेत साखर उत्पादन ५० हजार क्विंटलने वाढले आहे.
राज्यात १५ नोव्हेंबरपासून कारखाने सुरू झाले. पण यावर्षी गळीत हंगाम सुरू झाल्यानंतर एकही दिवस पाऊस झाला नाही. तसेच डिसेंबर ते फेब्रुवारी या तीन महिन्यांत दिवसा कडक ऊन आणि रात्री थंडी असे ऋतुचक्र होते. त्याचा परिणाम साखर उतारा वाढण्यावर झाल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. मात्र, कोल्हापूर विभागात गतवर्षीच्या तुलनेत आतापर्यंत उसाची ३ लाख टन उसाची वाढ झाली असून साखर उत्पादन ५ लाख क्विंटलने वाढले आहे. विभागाचा साखर उतारा ११.५ टक्के आहे. तसेच विभागात गेल्यावर्षी ३६ कारखाने सुरू होते तर यंदा ४० कारखाने सुरू राहिल्याचे साखर आयुक्तालयाकडील अहवालातून स्पष्ट झाले आहे.