पुणे : राज्यातील ऊसतोड कामगारांना विविध कल्याणकारी व सामाजिक सुरक्षा योजनांचा लाभ मिळवून देण्याचा निर्णय शासनाने घेतला. त्याकरिता लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाला कल्याणकारी योजना राबविण्यासाठी पुरेसा निधी उपलब्ध व्हावा, यासाठी साखर कारखान्यांकडून रक्कम घेतली जात आहे. मात्र, मागील तीन वर्षांतील मिळून अद्याप १५८ कोटी ९४ लाख रुपये थकीत राहिले आहेत. ही रक्कम महामंडळाच्या बँक खात्यात जमा करण्याच्या सूचना साखर आयुक्त डॉ. कुणाल खेमनार यांनी कारखान्यांना दिल्या आहेत.
साखर कारखान्यांना हंगाम २०२१-२२ च्या गाळपावर प्रति टन तीन रुपयांप्रमाणे सुमारे ३९.६६ कोटी १९३ साखर कारखान्यांनी महामंडळाकडे जमा केले. २०२३-२४ मध्येही प्रति टन तीन रुपयांप्रमाणे १८३ कारखान्यांनी मिळून ३९.६६ कोटी जमा केले आहेत; म्हणजे ही रक्कम ७८.५६ कोटी रुपये होते. हंगाम २०२१-२२ च्या गाळपावर शिल्लक सात रुपये टनापैकी तीन रुपये भरल्यानंतर दुसऱ्या टप्प्यात उर्वरित चार रुपये प्रति टनाप्रमाणे गाळप हंगाम २०२३ – २४ संपल्यानंतर १५ एप्रिल २०२४ पर्यंत भरावयाची एकूण रक्कम ५३.६४ कोटी रुपये आहे. तिसऱ्या टप्प्यात २२- २३ मध्ये झालेल्या गाळपावर प्रति टन १० रुपयांपैकी पाच रुपये प्रति टन ३० सप्टेंबरपर्यंत भरणा करायची आहे. ही रक्कम ५२.६५ कोटी रुपये होते. तर, चौथ्या टप्प्यातील रक्कम ३१ डिसेंबरपर्यंत भरणा करायची आहे. ही रक्कम ५२.६५ कोटी रुपये होते. एकूण १५८ कोटी ९४ लाख रुपये थकीच असल्याची माहितीही साखर आयुक्तालयातून देण्यात आली.