उस्मानाबादच्या धाराशिव साखर कारखान्यात ऑक्सिजन प्रकल्प सुरू; देशातील पहिलाच प्रकल्प

मुंबई: कोरोना विरोधातील लढाईत औषधोपचाराबरोबर रुग्णांसाठी ऑक्सिजनची उपलब्धता हा महत्त्वाचे मुद्दा बनला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील साखर उद्योगाने स्वतःच्या क्षमतांचा वापर करत सरकारला मदतीचा हात पुढे केला आहे. उस्मानाबाद येथील धाराशिव साखर कारखान्यामध्ये स्थापन केलेल्या ऑक्सिजन प्लांटमधून मेडिकल ऑक्सिजनच्या प्रत्यक्ष उत्पादनास बुधवारी सुरूवात झाली. देशातील ऑक्सिजन कमरतरेवर मात करून दिलासा देणारा देशातील हा पहिलाच प्रकल्प आहे.

महाराष्ट्रातील एकूण 25 कारखाने मेडिकल ऑक्सिजनचे उत्पादन करणार आहेत. त्यासाठी 600 कन्सेंट्रेटरची मागणी नोंदविण्यात आली आहे. बुधवारी या ऑक्सिजन प्रकल्पातून प्रत्यक्ष मेडिकल ऑक्सिजनची निर्मिती करण्यात आली.

पहिल्याच सिलिंडरमध्ये ऑक्सिजनची शुद्धता 93.7 ते 97 टक्के इतकी असल्याचे आढळली. कारखान्यातील इथेनॉलची सध्याच्या यंत्रणेत थोडेफार फेरबदल करून हा प्लांट कार्यान्वित करण्यात आला आहे.

ऑक्सिजन प्लांटविषयी माहिती देताना कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील म्हणाले, फक्त 18 दिवसांत आम्ही हा प्लांट स्थापन केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी साखर कारखान्यांना कारोनाविरोधातील लढाईत सहभागी होण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर असा विचार पुढे आला की आपण इथेनॉल प्लांटमध्ये कार्बन डाय ऑक्साईडची (सीओ 2) निर्मिती करतो. मग ऑक्सिजनही शक्य आहे. त्यामुळे संचालक मंडळाची 26 एप्रिल रोजी बैठक घेऊन निर्णय घेतला. आवष्यक मशिनरीच्या ऑर्डर दिल्या. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे एस. व्ही. पाटील, पुण्याच्या मौज इंजिनीअरिंगचे श्री ओक यांनी तांत्रिक सहकार्य केले.

अभिजित पाटील म्हणाले, कारखान्याच्या ऑक्सिजन प्लांटला 9 बुस्टर पंपांची गरज आहे. त्यापैकी 2 उपलब्ध झाले असून त्यातील एका पंपाचे काम सुरू झाले आहे. आजपासून 90 सिलिंडरचे उत्पादन सुरू झाले असून टप्प्याटप्प्याने ते 800 सिलिंडरपर्यंत वाढविले जाईल.

दरम्यान, राज्यामध्ये 25 साखर कारखाने ऑक्सिजन प्लांट स्थापन करणार आहेत. त्यातून राज्यातील मेडिकल ऑक्सिजनची गरज पूर्ण होईल असे मौज इंजिनीअरिंगचे श्री. ओक म्हणाले. ज्या कारखान्यांमध्ये इथेनॉल प्लांट आहे, अशा सर्व कारखान्यात मेडिकल ऑक्सिजन निर्मिती होऊ शकते. अर्थात यासाठी कारखान्यांनी पुढाकार घेण्याची गरज आहे. आगामी काही दिवसांत बारामती अ‍ॅग्रो युनीट 1, नॅचरल शुगर इंडस्ट्रिज, कोल्हापूरमधील दत्त-दालमिया शुगर मिलमध्ये मे महिन्याच्या अखेरपर्यंत ऑक्सिजन निर्मिती सुरू होऊ शकेल. यासाठी प्लांट उभारण्याचा खर्च 50 लाख रुपये आहे. हा ऑक्सिजन कारखाने ठराविक दरात सरकारी, खासगी हॉस्पिटलला पुरवू शकतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here