महाराष्ट्र: साखर कारखान्यांना पूर्वसूचनेशिवाय गाळप बंद न करण्याचा इशारा

मुंबई : साखर आयुक्त कार्यालयाने एका अधिसूचनेनुसार, साखर कारखान्यांनी साखर आयुक्तालय आणि शेतकऱ्यांना पूर्वसूचना न देता गाळप बंद करू नये असा इशारा दिला आहे.

याबाबत फायनान्शिअल एक्स्प्रेसमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी सांगितले की, १२.३२ लाख हेक्टरमधील ऊस शेतीमुळे राज्यात बंपर पिक उत्पादनाची अपेक्षा आहे. त्यामुळे ही पावले उचलण्यात आली आहेत.
या हंगामात गाळपासाठी जवळपास १०९६ लाख टन ऊस उपलब्ध आहे. यंदा १५ ऑक्टोबर २०२१ पासून गळीत हंगामाला सुरुवात झाली आहे. यामध्ये १९७ कारखान्यांनी सहभाग घेतला आहे. १५ फेब्रुवारीअखेर ८४५.२३ लाख टन ऊसाचे गाळप करण्यात आले आहे. तर ८६१.५३ लाख क्विंटल साखर उत्पादन झाले आहे. काही कारखाने शेतकऱ्यांना सूचना न देता गाळप बंद करतात. त्यामुळे शेतकऱ्यांचा ऊस गाळपाविना राहतो.

त्यांनी सांगितले की, साखर कारखान्यांनी सार्वजनिक चॅनल्सच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दोन आठवड्यांची नोटीस देण्याची गरज आहे. तरच शेतकरी कारखान्यांशी संपर्क करू शकतात. अधिसूचनेच्या माध्यमातून निर्देश देण्यात आले आहेत की, कार्यक्षेत्रातील सर्व ऊसाचे गाळप केले पाहिजे. जर साखर कारखाना पूर्ण ऊस गाळप करू शकत नसेल, तर त्यांनी शेजारील इतर कारखान्यांशी समन्वय राखण्याची गरज आहे. राज्यातील काही कारखान्यांकडून पुढील २० दिवसांत कामकाज बंद करण्याची शक्यता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here