महाराष्ट्र : राज्यात १८३ कारखान्यांकडून गाळप, १६.७८ लाख टन साखर उत्पादन

पुणे : राज्यात यंदाच्या गळीत हंगामात १५ डिसेंबरअखेर एकूण १८३ साखर कारखाने सुरू झाले असून या साखर कारखान्यांनी २०६.९९ लाख टन उसाचे गाळप केले आहे. आतापर्यंत १६७.८१ लाख क्विंटल (१६.७८ लाख टन) साखरेचे उत्पादन झाले आहे. असे साखर आयुक्तालयाच्या अहवालातून स्पष्ट करण्यात आले आहे. राज्याचा एकूण सरासरी साखर रिकव्हरी दर सुमारे ८.११ टक्के आहे. पुणे विभागात ५३.०४ लाख टन उसाचे गाळप झाले असून सरासरी साखर उत्पादन ४३.५८ लाख क्विंटल झाले आहे. साखरेचा उतारा सरासरी ८.२२ टक्के आहे. विभागात ३१ कारखाने कार्यरत असून त्यामध्ये १८ सहकारी आणि १३ कारखान्यांचा समावेश आहे.

कोल्हापूर विभागात ३९ कारखाने (२६ सहकारी आणि १३ खाजगी) आहेत. या कारखान्यांनी ४६.९३ लाख टन उसाचे गाळप केले असून, ४४.७२ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. या विभागात राज्यातील सर्वाधिक ९.५३ टक्के साखर उतारा आहे. सोलापुरात ४० कारखाने कार्यरत असून यामध्ये १५ सहकारी आणि २५ खाजगी कारखान्यांचा समावेश आहे. या कारखान्यांनी ३७.९५ लाख टन उसाचे गाळप करून २७.०७ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. विभागाचा साखर उतारा ७.१३ टक्के आहे.

अहमदनगर विभागात २२ कारखाने कार्यरत असून त्यापैकी १३ सहकारी आणि ९ खाजगी आहेत. या कारखान्यांनी २६.०६ लाख टन उसाचे गाळप केले आहे. एकूण १९.५९ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले असून त्याचा उतारा ७.५२ टक्के आहे. नांदेडमध्ये ९ सहकारी आणि १८ खाजगी अशा एकूण २७ कारखान्यांनी २२.९४ लाख टन उसाचे गाळप केले असून ८.२४ टक्के साखर उताऱ्यासह १८.९ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. छत्रपती संभाजीनगर विभागात १९ कारखान्यांनी (११ सहकारी आणि ८ खाजगी) १७.७८ लाख टन उसाचे गाळप केले आहे. त्यांनी १२.२३ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. अमरावती विभागात चार साखर कारखान्यांनी काम सुरू केले असून त्यात एक सहकारी आणि तीन खाजगी कारखान्यांचा समावेश आहे. या कारखान्यांनी २.२५ लाख टन उसाचे गाळप केले असून, १.७२ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे.

साखर उद्योगाशी संबंधित चालू घडामोडी आणि अपडेट्स जाणून घेण्यासाठी वाचत रहा चिनीमंडी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here