पुणे : केंद्र सरकारने इथेनॉल उत्पादनाच्या धोरणात बदल केल्यामुळे राज्यात साखर उत्पादन वाढण्यास मदत झाली आहे. राज्यात गाळप हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. आतापर्यंत ९८६ लाख टन ऊस गाळप पूर्ण झाले असून १०.१४ टक्के उताऱ्याने १०० लाख टन साखर उत्पादन झाले आहे. आणखी दोन ते तीन लाख टन साखर उत्पादनाचा अंदाज आहे. राज्यात झालेल्या ऊस गाळपात नेहमीप्रमाणे कोल्हापूर विभागाने सर्वाधिक ऊस गाळप, सर्वाधिक साखर उत्पादन तयार केले असून, उताऱ्यातील अव्वल स्थान कायम राखले आहे.
साखर उद्योगाने सरकारकडे साखर निर्यात आणि इथेनॉल उत्पादनावरील निर्बंध मागे घेण्यासाठी दबाव वाढवला आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांची ऊस बिले वेळेवर देण्यासाठी साखरेच्या किमान आधारभूत विक्री किमतीतही (एमएसपी) वाढ करण्याची मागणी लावून धरली आहे. लोकसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू झाल्याने याबाबतचा निर्णय लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतरच म्हणजेच 4 जूननंतर नवे सरकार अस्तित्वात आल्यानंतर होण्याची शक्यता आहे.
सद्यस्थितीत राज्यात ४३ कारखान्यांच्या गळीत हंगामाची समाप्ती झाली आहे. अद्याप १६४ साखर कारखाने सुरू आहेत. काही मोजक्याच साखर कारखान्यांचा ऊस गाळप हंगाम १० एप्रिलपर्यंत चालण्याचा अंदाज आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी संघाचे व्यवस्थापकीय संचालक संजय खताळ यांनीसांगितले की, केंद्र सरकारने ज्यूस आणि सिरपपासून इथेनॉल उत्पादनावर बंदी घातली, तसेच बी हेवीपासूनही बंदीच आहे. त्यामुळे सी हेवीपासून इथेनॉल उत्पादन करण्यास परवानगी आहे. त्याचा परिणाम साखरेच्या उताऱ्यात वाढ होण्यावर झाला आहे. राज्यात हंगामअखेर १०३ लाख टनाच्या आसपास साखर उत्पादन होईल. दरम्यान कोल्हापूर विभागाने २२८.३७ लाख टन ऊस गाळप केले असून ११.४७ टक्के उताऱ्याने २६१.९९ लाख क्विंटल साखर उत्पादन तयार केले आहे.