मुंबई : यंदा मागील वर्षीच्या तुलनेत साखर उत्पादनात मोठी घट होण्याचा अंदाज सहकार विभागाने व्यक्त केला आहे. यंदा महापूर आणि अतिवृष्टीमुळे नदीकाठच्या ऊस क्षेत्राचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे त्याचा परिणाम साखर उताऱ्यावर होण्याची शक्यता आहे. गळीत हंगाम १५ नोव्हेंबरपासून सुरू होणार असला, तरी हंगामावर निवडणुकीचे सावट असल्याने प्रत्यक्षात हंगाम नोव्हेंबर अखेर सुरू होण्याची शक्यता आहे. कृषी विभाग आणि मिटकॉनच्या अंदाजानुसार हेच उत्पादन ९० आणि १०२ लाख टन होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. यंदाच्या हंगामात राज्यात होणाऱ्या ऊस उत्पादनात कृषी विभाग आणि मिटकॉनच्या अंदाजात २३१ लाख टनांचा फरक आहे. कृषी विभागाने १००४, तर मिटकॉनने ११३५ लाख टनांचा अंदाज व्यक्त केला आहे.
ॲग्रोवनमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, राज्यात मागील वर्षी २०७ साखर कारखान्यांनी गाळप परवाना घेतला होता. या कारखान्यांनी १०७३.०८ लाख टन उसाचे गाळप केले आहे. ११०१.७ लाख क्विंटल साखर उत्पादन करण्यात आली होती. मागील वर्षी ८८ लाख टन साखर उत्पादन होईल असा अंदाज सरकारी यंत्रणेने व्यक्त केला होता. मात्र, प्रत्यक्षात ११० लाख टन साखर उत्पादन झाले होते. दर वर्षी सहकार आणि कृषी विभाग व्यक्त करत असलेला अंदाज फोल ठरत असल्याचे दिसते. कृषी विभागाच्या म्हणण्यानुसार यंदा ११.६७ लाख हेक्टर क्षेत्रावरील ऊस गाळपासाठी येण्याचा अंदाज आहे. तर हेच क्षेत्र १३.७२ लाख हेक्टर असल्याचे मिटकॉनने सांगितले आहे.