पुणे : राज्यातील शुगर टास्क फोर्स कोअर कमिटीतर्फे पुण्यामध्ये ऊसतोड कामगार, ऊस वाहतूक, यांत्रिक तोडणी समस्या व निवारण या विषयावर बैठक झाली. बैठकीला साखर उद्योगातील संबंधित तज्ज्ञ, कारखान्यांचे कार्यकारी संचालक, शेतकरी अभ्यासक नेते, ऊस शास्त्रज्ञ, ऊसतोड कामगार नेत्यांनी चर्चेत सहभाग घेऊन आपली बाजू मांडली. यावेळी ऊस तोडणी वाहतूक खर्चाची आकारणी सरासरीप्रमाणे न करता अंतरानुसार, टप्पानिहाय करण्याची मागणीही करण्यात आली आहे. साखरेला द्विस्तरीय (औद्योगिक व घरगुती) किंमत देण्याच्या बैठकीतील सूचनेचा पाठपुरावा केला जाईल, असे शुगर टास्क फोर्सचे निमंत्रक सतीश देशमुख यांनी सांगितले.
बैठकीत राज्यातील साखर उद्योगात ऊसतोडणीसाठी छोट्या मशिनची मागणी असूनही कंपन्यांकडून त्या तयार करण्यास मर्यादा येत आहेत. मात्र, तोडणी यंत्रात काही आवश्यक त्या सुधारणा केल्यास शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल असे मत मांडण्यात आले. वेळेत ऊसतोडणी होण्यासाठी यंत्रांची गरज आहे असे मत मांडण्यात आले. केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची शिष्टमंडळाच्या वतीने पुढील आठवड्यात भेट घेणार आहोत असे देशमुख यांनी सांगितले. बैठकीच्या सुरुवातीला श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखान्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी दत्ताराम रासकर यांनी शुगर टास्क फोर्सच्या स्थापनेची पार्श्वभूमी सांगितली. यावेळी सोमिनाथ घोळवे, महेश सूळ, डॉ. दीपक गायकवाड, गहिनीनाथ थोरे पाटील, रावसाहेब ऐतवडे, दीपक पाटील, तात्यासाहेब निकम, अतुल माने पाटील, अनंत निकम, डॉ. दशरथ ठवाळ, साहेबराव खामकर, भारत तावरे, सीमा नरोडे, दिलीप वारे, बाळ भिंगारकर, राहुल माने, संतोष पांगरकर, सुनील साळवे आदी उपस्थित होते.