महाराष्ट्र: नोंदणी करणाऱ्या कामगारांचा ऊसतोड महामंडळ उतरवणार विमा

पुणे : ‘लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाच्या वतीने ऊसतोड कामगारांसाठी विविध योजना राबविण्यात येतात. त्यासाठी ऊसतोड कामगारांनी महामंडळाकडे लवकरात लवकर नोंदणी करावी,’ असे आवाहन समाज कल्याण विभागाचे आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांनी केले. दरम्यान, महामंडळाच्या माध्यमातून प्रत्येक नोंदणीकृत कामगारांचा विमा उतरविला जाणार आहे, असे कामगार विभागाने स्पष्ट केले.

अॅग्रोवनमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, ऊसतोड कामगार संबंधित विविध प्रश्नांबाबत साखर आयुक्तालयात झालेल्या  बैठकीत डॉ. नारनवरे यांनी योजनांची माहिती दिली. साखर आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी सांगितले की, ऊसतोड कामगारांच्या प्रश्नांबाबत विविध विभागांचा एकत्रितपणे मसुदा तयार करण्यात येईल. त्यानुसार शासन निर्णय करण्यात येईल.

कामगार उपायुक्त डॉ. संतोष कानडे यांनी सांगितले की, ऊसतोड कामगारांनी महामंडळाकडे त्वरित नोंदणी करून घेणे आवश्यक आहे. महामंडळाच्यावतीने महिलांच्या आरोग्याची काळजी घेतली जाणार आहे. ऊसतोड कामगारांच्या मुला-मुलींच्या शिक्षणासाठी प्रत्येक तालुक्यात वसतिगृहांची उभारणी करण्यात येईल. यासाठी  कामगार विभागाच्या निर्देशानुसार अधिकारीदेखील भेटी देऊन निरीक्षण करतील.

साखर आयुक्त कार्यालयाचे सहसंचालक संतोष पाटील, कामगार उपायुक्त डॉ. संतोष कानडे, राज्य सहकारी साखर कारखाना संघाचे व्यवस्थापकीय संचालक संजय खताळ, वेस्टर्न इंडिया शुगर मिल असोसिएशनचे कार्यकारी संचालक अजित चौगुले, समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त बाळासाहेब सोळंकी आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here