पुणे : राज्यातील नऊ साखर कारखान्यांनी फेब्रुवारीच्या पहिल्याआठवड्यातच गाळप बंद केले आहे. यात सोलापूर जिल्ह्यातील सात तर नांदेडमधील २ साखर कारखान्यांचा समावेश आहे. जेमतेम दोन ते सव्वादोन महिनेच कारखाने चालले आहेत. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदाचा हंगाम लवकर संपण्याची दाट शक्यता आहे. महिनाभरात राज्यातील ७० टक्के ऊस गळीत संपेल असा अंदाज आहे. त्यातही पश्चिम महाराष्ट्र वगळता फेब्रुवारी अखेरपर्यंत बहुतांश कारखाने बंद होतील अशी शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे उत्पादन घटल्याचेही स्पष्ट होत आहे.
राज्यात तीन फेब्रुवारीअखेर ६४४ लाख टन उसाचे गाळप झाले. नऊ टक्के साखर उताऱ्याने ५८ लाख टन साखरेचे निर्मिती राज्यात झाली आहे. कोल्हापूर विभागात सर्वाधिक १०.७५ टक्के सरासरी साखर उताऱ्याने १६ लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे. त्यापाठोपाठ पुणे विभागात ९ टक्के साखर उताऱ्याने १३ लाख टन साखरेची निर्मिती झाली. अहिल्यानगरमध्ये आठ लाख टन, तर छत्रपती संभाजीनगर विभागात सात लाख टन साखर तयार झाली आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत चार कारखाने लवकर बंद झाले. पश्चिम महाराष्ट्रात महिनाभर कारखाने चालतील एवढा ऊस शिल्लक आहे. तर गेल्यावर्षीच्या दुष्काळी स्थितीमुळे अनेक ठिकाणी ऊस लागवड करण्यात आली नव्हती. त्यामुळे सोलापूरसारख्या सर्वाधिक साखर कारखाने असणाऱ्या जिल्ह्यात हंगाम गतीने संपत असल्याचे चित्र आहे. दरम्यान, कर्नाटकातील ऊस हंगाम १५ फेब्रुवारीपर्यंत संपण्याची शक्यता आहे.