पुणे : साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी राज्यातील ११ साखर कारखान्यांना गाळप परवाना घेतल्याशिवाय कारखाना सुरू केल्याप्रकरणी दंड ठोठावला आहे.
साखर आयुक्त कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्व कारखान्यांना एकूण ४१.५२ कोटी रुपयांचा दंड करण्यात आला आहे. गळीत हंगाम सुरू होण्याआधी राज्यातील साखर कारखान्यांना राज्य सरकारकडून गाळपासाठी परवाना घ्यावा लागतो.
यासाठी कारखान्यांनी अर्ज करण्याची प्रक्रिया आहे. त्यानंतर साखर आयुक्त कार्यालयाकडून त्यांना गाळपासाठी परवाना दिला जातो.
जर असा परवाना घेतला नसेल तर अशा कारखान्यांना दंड करण्याचा नियम आहे. यानुसार, साखर आयुक्त कारखान्यांना प्रति टन ५०० रुपयांपर्यंत दंड करू शकतात.
दंड ठोठावण्यात आलेल्यांपैकी सर्वाधिक साखर कारखाने पश्चिम महाराष्ट्रातील आहेत. उपलब्ध माहितीनुसार ही कारवाई थांबविण्यासाठी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांना निवेदन देण्यात येणार आहे.