सातारा : राज्यातील बहुतांश सहकारी आणि खासगी साखर कारखान्यांच्या बॉयलरचे प्रदीपन दसऱ्याच्या मुहूर्तावर झाले. त्यानंतर लगेच हंगाम सुरू होणे अपेक्षित होते. मात्र, विधानसभा निवडणुकीमुळे परजिल्ह्यातून येणाऱ्या टोळ्या मतदानाच्या कारणास्तव त्या त्या ठिकाणच्या नेत्यांमुळे गावातच आहेत. सद्यःस्थितीत ज्याठिकाणी निवडणुका नाहीत, त्या कर्नाटकसह इतर राज्यातून टोळ्या येत असल्या, तरी त्यांचे प्रमाण अत्यल्प आहे. सातारा जिल्ह्यात सहकारी आणि खासगी असे एकूण १८ कारखाने आहेत. या कारखान्यांचे अध्यक्ष त्या-त्या मतदारसंघातील निवडणुकीत गुंतले आहेत. त्याचा परिणाम गळीत हंगामावर झाला आहे. राज्यातही विधानसभा निवडणुकीनंतरच ऊस तोडणी सुरू होण्याची शक्यता आहे.
बॉयलरचे प्रदीपन झाल्यानंतर हंगामाची तयारी केली जात आहे. सद्यःस्थितीत कर्नाटक आणि लगतच्या सीमावर्ती राज्यातील कामगारांच्या टोळ्या येत असल्या तरी त्यांचे प्रमाण अत्यल्प आहे. या टोळ्यांनी अनेक ठिकाणी तोड सुरू केली, तरी त्यातून पुरेसे गाळप होण्याची शक्यता नसल्याने नंतर त्यांची तोडही बंद ठेवण्याच्या सूचना खासगी कारखान्यांनी केल्याची माहिती मिळत आहे. विधानसभा निवडणुकीमुळे ऊस उत्पादकच थेट मतदार असल्याने त्यांच्या गाठीभेटींवर सध्या सर्वांचाच जोर आहे. जिल्ह्यातील सर्वच कारखान्यांच्या कार्यक्षेत्रात बहुतांशी बीडसह इतर भागातून तोडणीसाठीच्या टोळ्या येतात. त्या टोळ्या रोखून धरण्यात आल्याची चर्चा आहे.