कोल्हापूर : यंदाचा गळीत हंगाम सुरू होण्यास केवळ पंधरवड्याचा कालावधी उरला आहे. राज्यातील बहुतांशी ऊस पट्ट्यात ऑक्टोबरच्या अंतिम आठवड्यापर्यंत झालेल्या पावसामुळे यंदाच्या हंगामाच्या प्रारंभीच कारखान्यांपुढील अडचणा निर्माण झाल्या आहेत. पावसामुळे शिवारात वाफसा नसल्याने हंगाम वेळेत सुरू होणे अडचणीचे ठरेल असा अंदाज आहे.त्याचबरोबर राज्यातील अनेक साखर कारखानदार विधानसभा निवडणुकीत गुंतल्याचा परिणामही हंगामावार होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
जोरदार पावसामुळे खोळंबा !
ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत जोरदार पाऊस झाल्याने ऊस शिवारात पाणी अद्याप साचलेले आहे. राज्यातील ऊस हंगामाला मॉन्सूनोत्तर पावसाचा अडथळा वरून अगदी माळभागातील शेतीलाही वाफसा नसल्याने यंदा ऊस हंगामाचा प्रारंभ धीमा होण्याची शक्यता आहे. कारखान्यांनी १५ नोव्हेंबरपासून हंगाम सुरू होईल या बेताने क्रमपाळीचे नियोजन सुरू केले होते. विधानसभा निवडणूक २० नोव्हेंबरला असल्याने बहुतांशी मजूर निवडणूक झाल्यानंतरच करार केलेल्या कार्यक्षेत्रात येतील, अशी शक्यता आहे. यामुळे तांत्रिकदृष्ट्या कारखाने नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात गतीने सुरू होणे अपेक्षित आहे.
९०४ लाख टन ऊस उपलब्ध
राज्य साखर आयुक्त कार्यालयाच्या अंदाजानुसार, २०२४-२५ हंगामात महाराष्ट्रात गाळपासाठी ९०४ लाख टन ऊस उपलब्ध असेल, जो गेल्या हंगामात १०७६ लाख टन गाळपाच्या तुलनेत कमी आहे. उपलब्ध उसापैकी सुमारे १२ लाख टन इथेनॉल उत्पादनासाठी वळवणे अपेक्षित आहे. यामुळे साखरेचे उत्पादन ९० ते १०२ लाख टनांपर्यंत घसरण्याचा अंदाज आहे. गेल्या वर्षी महाराष्ट्रातील कारखान्यांनी ११० लाख टन साखरेचे उत्पादन केले होते.
साखर उद्योगाविषयी अधिक घडामोडी जाणून घेण्यासाठी, Chinimandi.com वाचत रहा.