पुणे : चालू हंगामात साखर उत्पादनात महाराष्ट्र देशात पहिल्या क्रमांकावर असल्याची माहिती साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिली. साखर आयुक्तालयाकडील आकडेवारीनुसार हंगाम २०२१-२२ मध्ये २७ मार्च २०२२ अखेर महाराष्ट्रात एकूण १९७ साखर कारखान्यांनी गाळप हंगामात सहभाग घेतला. यामध्ये ९८ सहकारी तर ९९ खासगी कारखान्यांचा समावेश आहे. आतापर्यंत ११२०.०४ लाख टन उसाचे गाळप झाले असून राज्यात ११६२.७४ लाख क्विंटल (११६ लाख टन) साखर उत्पादन झाले आहे.
साखर उत्पादनात महाराष्ट्राने चीन, थायलंड, ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान या देशांनाही पिछाडीवर टाकल्याचे साखर आयुक्तांनी सांगितले. याशिवाय महाराष्ट्र ऊस आणि इथेनॉल उत्पादनात ब्राझीलसोबत स्पर्धा करीत आहे. चालू वर्षात ऊस गाळपात आणि साखर उत्पादनात महाराष्ट्रातला पहिले स्थान मिळाले आहे. या वर्षी सरासरी साखर उतारा १०.३८ टक्के आहे.
गेल्या दोन-तीन वर्षांपासून उत्तर प्रदेश साखर उत्पादनात महाराष्ट्रापेक्षा आघाडीवर होता. तर महाराष्ट्राला दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले होते. यावर्षी हे चित्र बदलले आहे. ऊस गाळप आणि साखर उत्पादनात महाराष्ट्राने उत्तर प्रदेशला पिछाडीवर टाकले आहे.
२६ मार्चअखेर उत्तर प्रदेशमध्ये हंगाम २०२१-२२ मध्ये साखर कारखान्यांनी ८३३.६० लाख टन उसाचे गाळप करून ८४.०६ लाख टन साखर उत्पादन केले आहे. साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी सांगितले की, शेतकऱ्यांना एफआरपीनुसार पैसे मिळावेत यासाठी साखर आयुक्तालयाच्यावतीने प्रयत्न सुरू आहेत.