पुणे : सद्यस्थितीत राज्यात ६८५ लाख टन ऊस गाळप पूर्ण झाले आहे. सरासरी ९.६२ टक्के उताऱ्यानुसार ६६ लाख टन साखरेचे उत्पादन हाती आले आहे. राज्यात मार्चअखेरपर्यंत गळीत हंगाम चालण्याची अपेक्षा असून हंगामाअखेर ९२ लाख टन साखर उत्पादन होण्याची अपेक्षा आहे. सद्यःस्थितीत दोन साखर कारखान्यांची धुराडी बंद झाली असून साखर उत्पादन आणि २०५ कारखान्यांचा हंगाम सुरू आहे.
साखर आयुक्तालयाकडील माहितीनुसार, चालूवर्षीच्या हंगामात एकूण १४ लाख हेक्टरवर ऊस पीक आहे. त्यातून गाळपासाठी एकूण १०२२.७३ लाख टनाइतकी ऊस उपलब्ध होईल. प्रत्यक्षात ९० टक्के ऊस गाळपास येईल, असे गृहित धरून ९२४ लाख टनांइतके ऊस गाळप होणे अपेक्षित आहे. कोल्हापूर विभागात सर्वाधिक १५७.२९ लाख टन ऊस गाळप झाले आहे. या विभागात सर्वाधिक १०.९८ टक्क्यांच्या उताऱ्यासह १७२.७३ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे.
कोल्हापूर विभाग उताऱ्यात अग्रस्थानी आहे. साखर आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार म्हणाले की, मजूर उपलब्ध झाल्यामुळे हंगाम उशिराने सुरू झाला. हंगामाच्या सुरुवातीस ऊस उपलब्धता पाहता तीन महिनेच हंगाम चालेल, असे चित्र होते; मात्र मार्चअखेरपर्यंत हंगाम चालेल. साखर उत्पादनात अपेक्षेपेक्षा थोडी वाढ होईल.