धाराशिव : राज्यातील २०० हून अधिक साखर कारखान्यांचा गाळप हंगाम १५ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. यंदा गाळपासाठी ११ लाख ६७ हजार ४३ हेक्टरवरील ९०४ लाख मे. टन ऊस गाळपास उपलब्ध असणार आहे. मागील वर्षीच्या तुलनेत ऊस क्षेत्रात २ लाख ३९ हजार ९७८ हेक्टरची म्हणजेच जवळपास १७.०६ टक्के घट झाली आहे.
‘दिव्य मराठी’मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, २०२३-२४ या वर्षात राज्यात १४ लाख ७ हजार २१ हेक्टरवरील उसाचे गाळप होऊन १०७२ लाख मे. टन साखरेची निर्मिती झाली होती. मात्र, यंदा कोल्हापूर विभागात सर्वाधिक ३ लाख २४ हजार हेक्टर क्षेत्रावरील ऊस गाळपास उपलब्ध असणार आहे. त्या पाठोपाठ पुणे विभागातील २ लाख १२ हजार हेक्टरवरील ऊस गाळपास येणार आहे. सोलापूर विभागात १ लाख ३३ हजार हेक्टर उसाचे क्षेत्र घटले आहे. त्यानंतर औरंगाबाद विभागात ५८ हजार ८७७ हेक्टर, तर अमरावती विभागात सर्वाधिक ७ हजार २१० हेक्टर क्षेत्र घटले आहे.
यंदाच्या वर्षी गाळपास ११ लाख ६७ हजार ४३ हेक्टर ऊस गाळपास येणार असल्याने साखर उत्पादनात सरासरी १० टक्केची घट होण्याची शक्यता साखर कारखानदारांनी व्यक्त केली आहे. गळीत हंगाम सुरळीत राहील असे सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात १५ दिवस उशिराने म्हणजेच १५ नोव्हेंबरपासून गाळपास सुरुवात होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.