पुणे : राज्यात गेल्यावर्षी अवकाळी पावसाने गाळप हंगाम तर लांबलाच शिवाय टनेजमध्येही वाढ झाली होती. त्यामुळे गळीत हंगामात शेतकऱ्यांना उसापोटी ३६ हजार ७५३ रुपये मिळाले आहेत. साखर उताऱ्यात आघाडीवर असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील ऊस उत्पादकांना सर्वाधिक ४,९०७ कोटी रुपये मिळाले आहेत. तर गाळपात आघाडीवर असलेल्या सोलापूर जिल्ह्यातील ऊस उत्पादकांना ४,३४७ कोटी रुपये मिळाले आहेत. मागील वर्षी २०७ साखर कारखान्यांनी एकूण १,०७६ लाख मेट्रिक टन ऊस गाळप केले होते. कारखान्यांकडून एकूण ३६ हजार ७५३ कोटी रुपये शेतकऱ्यांना देय असून आतापर्यंत ३६ हजार ६६३ रुपये दिले आहेत. अद्याप ९० कोटी रुपये शेतकऱ्यांना मिळालेले नाहीत.
मागील वर्षीच्या पावसाळ्यात जेमतेम व सरासरीपेक्षा कमी पाऊस पडला होता. त्यामुळे उसाची वाढ म्हणावी तशी झाली नाही. त्यामुळे साखर हंगामावर परिणाम होणार हा अंदाज कारखान्यांचा होता. मात्र डिसेंबर व नंतरच्या अवकाळी पावसाने उसाचे वजन वाढले. त्यामुळे हंगाम लांबला. कोल्हापूर व सांगली जिल्ह्याचे गाळप २४२ लाख मेट्रिक टन झाले होते. या दोन जिल्ह्यातील ऊस उत्पादकांना ७,०८१ कोटी रुपये मिळाले आहेत. मागील मागील वर्षी राज्यात सोलापूर जिल्ह्याचे सर्वाधिक १६८ लाख ४७ मेट्रिक टन गाळप व ९.४६ टक्के साखर उतारा मिळाला. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक २,९०० रुपये दर ऊस उत्पादकांना मिळाला आहे.