कोल्हापूर : येत्या काही दिवसांत राज्यातील ऊस गळीत हंगामाला सुरुवात होणार आहे. यावर्षी महापूर व इतर नैसर्गिक आपत्तीमुळे ऊस उत्पादनात घट होणार असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळे ऊस मिळवण्यासाठी साखर कारखान्यांना प्रयत्न करावे लागणार आहेत. त्यामुळे केंद्र सरकारने निश्चित केलेल्या एफआरपी निकषानुसार पश्चिम महाराष्ट्रातील साखर कारखान्यांच्या ऊस दर घोषणेकडे लाखो शेतकऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांच्या दरावर राज्यातील इतर जिल्ह्यांतील साखर कारखान्यांचा दर निश्चित होत असल्याने याकडे लाखो शेतकऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ऊस गळीत हंगामाला महत्त्व प्राप्त झाले आहे.
कारखान्यांच्या सरासरी साखर उताऱ्यातील १०.२५ टक्के हा पायाभूत उतारा घेऊन यासाठी ३४०० रुपये व त्यापुढील प्रत्येकी एक टक्का उताऱ्याकरिता ३३२ रुपये असे प्रतिटन प्रमाणे होणाऱ्या रकमेतून तोडणी वाहतूक खर्च वजा करून उर्वरित रक्कम शेतकऱ्याला ऊस दर म्हणून दिला जातो. शासनाने १५ नोव्हेंबरनंतरच ऊस गाळप परवानगी दिली आहे. तसेच गेले आठ दिवस सतत पडणाऱ्या परतीच्या पावसाने ऊस तोडणी अडथळा येऊ शकतो. यामुळे हंगाम लवकर सुरू व्हायची शक्यता धुसर आहे. यंदा उन्हाळ्यात कमी पाणी उपलब्धता, नंतर अतिरिक्त पाऊस, महापुराने झालेले उसाचे नुकसान, रोग, कीड यामुळे झालेले नुकसान, प्रतिकूल हवामानामुळे उसाची खुंटलेली वाढ यामुळे ऊस उत्पादनात निश्चितच घट होणार आहे. परिणामी, साखर कारखान्यांना आपले उद्दिष्ट गाठताना दमछाक होणार आहे. उसाची कमतरता असल्याने उसाची पळवापळवी होणार आहे.
साखर उद्योगाविषयी अधिक घडामोडी जाणून घेण्यासाठी, Chinimandi.com वाचत रहा.