सातारा : पावसाअभावी उसाचे घटलेले क्षेत्र, विविध साखर कारखान्यांनी वाढविलेली क्षमता यामुळे यावर्षी ऊस गाळप हंगाम केवळ तीन महिने चालण्याची शक्यता आहे. पावसाने दडी मारल्याने उसाचे वजन घटण्याची शक्यता आहे. सातारा जिल्ह्यात पावसाअभावी पिकांची स्थिती अत्यंत गंभीर झाली आहे. शेतकऱ्यांच्या डोळ्यासमोर ऊस पीक वाळत चालले आहे. संभाव्य दुष्काळाच्या शक्यतेने अनेक शेतकरी ऊस वाळून जाण्याएवजी चाऱ्यासाठी विकण्याच्या विचारात आहे.
ॲग्रोवनमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, यंदा पावसाअभावी ऊस आणि साखर उत्पादनावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता वर्तीवली जात आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने मागील हंगामातील थकीत ऊस बिले मिळाल्याशिवाय यंदा कारखान्यांना गाळप परवाना देऊ नका, अशी भूमिका घेतली आहे. सातारा जिल्ह्यात यावर्षी १७ साखर कारखाने गाळप करण्याची तयारी करत आहेत. मागील वर्षी बंद राहिलेले किंवा कमी कालावधीत बंद झालेले चार कारखाने यावर्षी गाळप करणार आहेत. यावर्षी जिल्ह्यातील उसाचे क्षेत्र घटले आहे.
सातारा जिल्ह्यात ६५ ते ७० हजार हेक्टरवर ऊस उपलब्ध आहे. यंदा जावळीतील प्रतापगड, खंडाळा कारखाना, किसन वीर, शिवनेरी हे कारखाने पूर्ण क्षमतेने गाळप करतील. काही मोठ्या कारखान्यांनी गाळप क्षमता वाढवली आहे. त्यांच्या कार्यक्षेत्रातील ऊस इतरत्र जाऊ नये, यासाठी त्यांना प्रयत्न करावे लागणार आहेत. ऊस दराचा प्रश्न कायम असून, एफआरपी एकरकमी देण्याबाबत अद्याप कोणत्याही कारखान्याने ठोस भूमिका घेतलेली नाही. काही कारखान्यांनी कमी दर दिला आहे. काही कारखान्यांची एफआरपी तीन हजारांच्या आतच राहिली आहे. इतर उपपदार्थ निर्मितीतून मिळणाऱ्या उत्पन्नाचा वाटा शेतकऱ्यांना मिळत नसल्याचा आक्षेप आहे.