महाराष्ट्र : राज्यातील हजारो साखर कामगार १६ डिसेंबरपासून जाणार संपावर

पुणे : राज्यातील हजारो साखर कामगार आपल्या विविध मागण्यांसाठी १६ डिसेंबरपासून संपावर जाणार असल्याची घोषणा महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळाचे अध्यक्ष तात्यासाहेब काळे यांनी केली. पुणे येथील साखर कामगार प्रतिनिधी मंडळ यांच्या कार्यालयात झालेल्या महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळ व महाराष्ट्र राज्य साखर कामगार महासंघ यांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची एकत्रित बैठक झाली. या बैठकीत १४ ऑक्टोबर रोजी सांगली येथे साखर कामगारांच्या राज्यव्यापी मेळाव्यात १६ डिसेंबरपासून कामगारांच्या बेमुदत संपाच्या निर्णयाप्रमाणे राज्यातील सर्व साखर कामगार मागण्यांसाठी संपावर जातील, असे काळे यांनी स्पष्ट केले.

यावेळी संघटनेचे सरचिटणीस शंकरराव भोसले, कार्याध्यक्ष अविनाश आपटे, राऊसाहेब पाटील, महाराष्ट्र राज्य साखर कामगार महासंघाचे अध्यक्ष पी. के. मुडे, सरचिटणीस आनंदराव वायकर, अहमदनगर जिल्हा समन्वय समितीचे सरचिटणीस डी. एम. निमसे, कोषाध्यक्ष अशोकराव पवार, कार्याध्यक्ष नितीन गुरसळ, उपाध्यक्ष ज्ञानदेव आहेर, मनोहर शिंदे आदी उपस्थित होते.

या आहेत साखर कामगारांच्या प्रमुख मागण्या…

1) साखर उद्योग व जोडधंदयातील कामगारांचे वेतन व सेवाशर्ती ठरविणेबाबत शासनाने ताबडतोब त्रिपक्ष समिती गठीत करावी.

2)साखर उद्योगातील कामगारांचे थकीत वेतन मिळालेच पाहिजे.

3)साखर उद्योगातील रोजदांरी, कंत्राटी, नैमित्तीक व तात्पुरते काम करणाऱ्या कामगारांनाही त्रिपक्षीय समितीच्या कराराप्रमाणे अंमलबजावणी करून वेतनवाढ समान कामाला समान वेतन मिळावे.

4) भाडेतत्वावर व भागीदारीने व विक्री केलेल्या तसेच खासगी साखर कारखान्यातील कामगारांना त्रिपक्षीय समितीच्या कराराप्रमाणे वेतन मिळाले पाहिजे व त्यांच्या थकीत पगाराची रक्कम अग्रक्रमाने मिळावी.

5) शेती महामंडळातील कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांची सोडवणुक करावी.

साखर उद्योगाबाबत अधिक माहिती आणि अपडेट्ससाठी Chinimandi.com वाचत राहा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here