साखर उत्पादनात महाराष्ट्र देशात अव्वल, आतापर्यंत ७९ लाख टन उत्पादन

कोल्हापूर : यंदाच्या गळीत हंगामात आतापर्यंत कारखान्यांनी २२३ लाख टन साखरेचे उत्पादन केले आहे. यामध्ये महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे. महाराष्ट्रातील साखर कारखान्यांनी ७९ लाख टन साखरेचे उत्पादन घेतले आहे. तर उत्तर प्रदेशात ६८ लाख टन साखर उत्पादन करून द्वितीय क्रमांकावर आहे. कर्नाटकातील साखर कारखान्यांनी ४२ लाख टन साखर उत्पादित केली असून हे राज्य तिसऱ्या क्रमांकावर आहे. देशातील एकूण उत्पादनापैकी ८५ टक्के साखर उत्पादन या तीन राज्यांत झाले आहे.

देशातील उर्वरित राज्यांनी १५ टक्के साखर उत्पादन केले आहे. देशात ३२७ खासगी, ४०५ सहकारी असे एकूण ७३२ कारखाने आहेत. त्यापैकी महाराष्ट्रात १९५ ते २१०, उत्तर प्रदेशात ११५ ते १२५ कारखाने आहेत. देशामध्ये आतापर्यंत २२३ लाख टन साखर उत्पादन झाले आहे. यंदा ५०७ कारखाने सुरू आहेत. गेल्यावर्षी ५०३ कारखाने सुरू होते. गेल्यावर्षी साखर कारखान्यांनी ९.६९ टक्के उताऱ्याने २,३६२ लाख टन उसाचे गाळप केले, तर यंदाच्या हंगामात आतापर्यंत ९.८६ टक्के उताऱ्याने २, २६८ लाख टन उसाचे गाळप केले आहे. सद्यस्थितीत महाराष्ट्रातील ४ आणि कर्नाटकातील १५ कारखान्यांचा गळीत हंगाम संपला आहे. महाराष्ट्र राज्य साखर उत्पादनात देशात आघाडीवर असून उत्तर प्रदेश दुसऱ्या आणि कर्नाटक तिसऱ्या क्रमांकावर आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here