महाराष्ट्र : ऊस शेतीमधील ‘एआय’ साठी होणार त्रिपक्षीय करार, ‘व्हीएसआय’च्या कृतिगटाचा पहिल्या बैठकीत निर्णय

पुणे: राज्याच्या ऊस शेतीत कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्राचा वेगाने विस्तार करण्यासाठी त्रिपक्षीय करार करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या (व्हीएसआय) कृती गटाच्या बैठकीत घेण्यात आला. ‘व्हीएसआय’च्या नियामक मंडळाच्या अलीकडेच झालेल्या बैठकीत अध्यक्ष व माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी एआय तंत्राचा विस्तार करण्याची सूचना केली होती. तसेच त्यांनी याबाबत राज्याचे माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ‘व्हीएसआय’चा एक कृतिगट देखील स्थापन केला होता. या गटाची पहिली बैठक शनिवारी (ता.५) झाली.

राष्ट्रीय सहकारी साखर कारखाने महासंघाचे अध्यक्ष माजी पणनमंत्री हर्षवर्धन पाटील, माजी कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम, माजी आरोग्यमंत्री राजेश टोपे, माजी सहकार राज्यमंत्री जयप्रकाश दांडेगावकर, बारामती येथील ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टचे (एडीटी) विश्वस्त व सकाळ माध्यम समूहाचे अध्यक्ष प्रतापराव पवार, व्हीएसआयचे सल्लागार शिवाजीराव देशमुख व महासंचालक संभाजी कडू-पाटील, विश्वस्त इंद्रजित मोहिते, ‘विस्मा’चे अध्यक्ष बी. बी. ठोंबरे, साखर कारखाने महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश नाईकनवरे, साखर संघाचे व्यवस्थापकीय संचालक संजय खताळ आदी उपस्थित होते.

या बैठकीला ‘विस्मा’चे कार्यकारी संचालक अजित चौगुले, राज्याचे कृषी संचालक रफिक नाईकवाडी (विस्तार व प्रशिक्षण), एडीटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश नलावडे, एडोटीच्या कृत्रिम बुद्धिमत्ता प्रकल्प चमूतील सहयोगी प्राध्यापक डॉ. योगेश फाटके, विषय विशेषज्ञ डॉ. विवेक भोईटे तसेच दूरदृष्यप्रणालीद्वारे कृषी आयुक्त सूरज मांढरे, व्हीएसआयच्या नियामक मंडळाचे सदस्य विवेक कोल्हे उपस्थित होते.

तीन घटक एकत्र येणार

एआय तंत्रज्ञानाची यशस्वी जुळणी ‘एडीटी’ने केली आहे. तर ‘व्हीएसआय मध्ये प्रशिक्षण देण्याची क्षमता आहे. तसेच राज्यातील साखर कारखाने क्षेत्रिय पातळीवर थेट शेतकऱ्यांसोबत काम करीत आहेत. त्यामुळे या तीनही घटकांनी एकत्र यावे. त्यासाठी त्रिपक्षीय करार करावा व त्यातून आपापली जबाबदारी निश्चित करून एआय तंत्रज्ञानाचा विस्तार करावा, असा निर्णय कृती गटाच्या बैठकीत सर्वानुमते घेण्यात आला.

लवकरच दुसरी बैठक

त्रिपक्षीय कराराचा मसुदा निश्चित करण्यासाठी गटाची लवकरच दुसरी बैठक घेण्याचे निश्चित करण्यात आले. या वेळी जयंत पाटील म्हणाले की, ऊस शेतीमधील या नवतंत्राला गती देण्यासाठी, व्हीएसआय व साखर कारखान्यांची भूमिका अधिक महत्त्वाची आहे. बारामतीमध्ये केव्हीकेच्या प्रक्षेत्रात विकसित केलेले तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत जलदगतीने पोहोचविण्यासाठी व्हीएसआयच्या प्रशिक्षण प्रणालीचा अनुभव उपयुक्त ठरणार आहे. कारखान्यांच्या संबंध थेट शेतकऱ्यांशी असल्यामुळे त्यांची सोबत या प्रकल्पाचा विस्तारात मोलाची ठरेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here