पुणे : महाराष्ट्रात ऊसाच्या उत्पादनात झालेल्या मोठ्या घसरणीनंतर आणि शुक्रोजच्या प्रमाणात घट झाल्याने राज्यातील २१० नोंदणीकृत साखर कारखान्यांपैकी सध्या फक्त सहाच कारखाने सुरू आहेत. या हंगामात राज्यात साखर उत्पादनात घसरण दिसून आली आहे, त्यामुळे इथेनॉल पुरवठ्याचे उद्दिष्ट गाठण्यात कारखाने असमर्थ आहेत. सहकारी आणि खासगी कारखानदारांच्या म्हणण्यानुसार, इथेनॉल पुरवठा वर्ष (डिसेंबर २०२२ ते नोव्हेंबर २०२३) या कालावधीत महाराष्ट्रात १२७ कोटी लिटर इथेनॉलचे उत्पादन होईल. आपल्या १३२ कोटी लिटरच्या उद्दिष्टाच्या तुलनेत हे कमी आहे.
याशिवाय, राज्यात १२०-१२२ लाख टनाच्या आधीच्या अनुमानाच्या तुलनेत जवळपास १०५ ते १०६ लाख टन साखर उत्पादन होईल. यापूर्वी जुलै-ऑगस्ट २०२२ मध्ये चांगला पाऊस आणि उसाचे वाढते क्षेत्र यामुळे उत्साहित झालेल्या महाराष्ट्राच्या साखर आयुक्त कार्यालयाने १३८ लाख टन उत्पादनाचे अनुमान व्यक्त केले होते. सद्यस्थितीत ९ एप्रिलअखेर केवळ सहा कारखाने (पुणे, सोलापूर, उस्मानाबाद आणि बीडमध्ये प्रत्येकी एक तसेच जालनामध्ये दोन) सुरू आहेत. राज्यात आतापर्यंत कारखान्यांनी १०५१.३० लाख टन उसाचे गाळप करुन १०४.८८ लाख टन साखर उत्पादन केले आहे.
गेल्या आठवड्यात अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागासह पेट्रोलियम सचिवांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी साखर उद्योगाने इथेनॉल पुरवठा वर्ष २०२२-२३ च्या अंतिम दोन तिमाहीसाठी इथेनॉल पुरवठा करार पूर्ण करण्यात असमर्थता दर्शवली आहे. महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह शुगर फॅक्टरीज फेडरेशनचे कार्यकारी संचालक संजय खताळ यांनी दि इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना इथेनॉल उत्पादनात घट होण्याच्या वृत्ताला दुजोरा दिला.
महाराष्ट्रात उत्पादन घटल्याने यावर्षी इथेनॉल १२ टक्के मिश्रणाच्या उद्दिष्टावर परिणाम होईल का, याविषयावर इंडियन शुगर मिल्स असोसिएशनचे (इस्मा) अध्यक्ष आदित्य झुनझुनवाला यांनी उद्दिष्ट पूर्ण होईल अशी अपेक्षा व्यक्त केली. अनेक साखर कारखान्यांनी धान्यावर आधारित डिस्टिलरी स्थापन केली असल्याचे ते म्हणाले.