लॉजिस्टिक पार्क, इथेनॉलमुळे महाराष्ट्राचा मोठा फायदा : नितीन गडकरी

मुंबई : रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या वतीने देशभरात २ लाख कोटी रुपये खर्चून लॉजिस्टिक पार्क तयार करण्यात येत आहे. त्यामुळे महाराष्ट्राला याचा मोठा फायदा होईल असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले. देशात आता २० महामार्गावर विमाने उतरवण्याची सुविधा आहे. वर्धा जिल्ह्यात ड्राय पोर्ट तयार करण्याचे काम सुरू झाले आहे. तसेच सोलापूर, सांगली आणि नाशिक येथेही नवे ड्राय पोर्ट तयार केले जातील. या योजनांमध्ये साठवणूक, प्री कुलिंग प्लांट आणि उत्पादनावर प्रक्रिया करण्याची व्यवस्था असेल अशी माहिती गडकरी यांनी दिली. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रिजच्या वतीने आयोजित नव बजेटच्या परिप्रेक्ष्यातून महाराष्ट्राचा विकास या विषयावरील चर्चासत्रात ते बोलत होते.

गडकरी यांनी महाराष्ट्रातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना इथेनॉल उत्पादन करण्यास प्रोत्साहन देण्याचा आग्रह केला. ते म्हणाले, पेट्रोल आणि डिझेल या इंधनापेक्षा इथेनॉल दहा पटीने चांगले इंधन आहे. ते स्वस्त आणि पर्यावरण पूरक आहे. पुण्यात आधीच इथेनॉलचे तीन पंप सुरू आहेत. इथेनॉल इंधन म्हणून वापरले गेल्यास प्रदुषणावर चांगले नियंत्रण मिळवता येईल असे गडकरी म्हणाले. त्यांनी सांगितले की, इथेनॉल उत्पादनातून महाराष्ट्रात ५० लाख युवकांना रोजगार मिळू शकतो. देशात ४.५ ट्रिलियन लिटर इथेनॉलची गरज आहे. महाराष्ट्रातील ऊस उत्पादक शेतकरी इथेनॉल उत्पादनातून फायदा मिळवू शकतात. त्यातून ग्रामीण महाराष्ट्राचा चेहरा मोहरा बदलून जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here