महाराष्ट्र : हंगाम २०२४-२५ मध्ये राज्यात सुमारे १०० ते १०२ लाख टन साखर उत्पादनाचा ‘विस्मा’चा अंदाज

पुणे : वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशनच्या कार्यकारी मंडळाची सभा शुकवारी (२० डिसेंबर) संस्थेचे अध्यक्ष बी. बी. ठोंबरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. सभेमध्ये साखर उद्योगाच्या विविध विषयावर सविस्तर चर्चा झाली. सभेमध्ये चर्चा झालेले काही प्रमुख मुद्दे पुढीलप्रमाणे…

चालू गाळप हंगामात १८ डिसेंबर, २०२४ पर्यंत सहकारी ९४ व खाजगी ९२ असे राज्यातील एकूण १८६ साखर कारखान्यांनी २३३.६७ लाख टन उसाचे गाळप करून १९.२६ लाख टन साखरेचे उत्पादन केले आहे. साखरेचा सरासरी उतारा ८.२४ टक्के इतका राहिला. सर्वाधिक उतारा कोल्हापूर विभाग – ९.६८, पुणे – ८.३४, नांदेड – ८.३४, अमरावती – ७.८८, अहमदनगर – ७.६२, सोलापूर – ७.३३, छत्रपती संभाजीनगर – ६.८९, नागपूर विभाग – ५ टक्के इतका आहे. विभागनिहाय सर्वाधिक ऊस गाळप पुणे विभागामध्ये ५९.६६ लाख टन तर दुसऱ्या स्थानावर ५३.११ लाख टनासह कोल्हापूर विभाग आहे.

राज्यातील चालू गाळप हंगामाकरीता शेतामधील ऊस पिकाचा विभागनिहाय आढावा घेतला असता, एप्रिल ते जुनमधील अवर्षण व तद्नंतर नोव्हेंबरपर्यंत अति पर्जन्यवृष्ठीमुळे उसाची लवकर पक्वता, तुरा येणे, वाढ कमी झाल्याने हेक्टरी उत्पादन कमी झाल्याचे दिसून आले. त्याचप्रमाणे राज्यातील सरासरी साखरेचा उतारासुध्दा गेल्या वर्षीच्या तुलनेत थोडा कमी राहण्याची शक्यता आहे.चालू गाळप हंगाम २०२४-२५ मध्ये १०० ते १०२ लाख टन साखरेचे उत्पादन होण्याचे अनुमान आहे. त्यामधील १२ लाख टन साखर इथेनॉलकडे वळविण्याचा अंदाज आहे. अशाप्रकारे एकूण निव्वळ ९० लाख टन साखर उत्पादन होईल, असे सर्वानुमते अंदाजित करण्यात आले.

राज्यातील स्थानिक बाजारपेठेतील साखरेचे दर ३३०० ते ३४०० प्रती क्विंटल हे सरासरी ३५०० ते ३६०० दराच्या तुलनेत मोठ्या प्रमाणात कमी झाल्याचे दिसून येत आहेत. सध्या उत्पादन खर्चापेक्षा कमी किंमतीमध्ये साखर विकी करावी लागत आहे. उत्पादन खर्चापेक्षा कमी उत्पन्न साखर विक्रीमधून मिळत असल्याने कारखान्यांना तोटा सहन करावा लागत आहे. त्याकरीता केंद्र शासनाने साखर उद्योगाच्या हितासाठी तातडीने साखरेची किमान विक्री किंमत प्रती किलो ४१ रुपयापेक्षा जास्त करण्याची मागणी करण्यात आली.

गाळप हंगाम २०२४-२५ करीता उसाची किमान खरेदी किंमत (FRP) मध्ये वाढ झाल्याने साखर उत्पादन त्याचबरोबर इथेनॉल उत्पादनाच्या खर्चामध्ये वाढ झासल्याने साखर, ऊसाचा रस, बी हेवी, सी हेवीपासून तयार होणाऱ्या इथेनॉलकरीतासुध्दा खरेदी किंमतीमध्ये शासनाने सुधारीत दर किमान प्रती लिटर ३ ते ५ रुपये वाढ करण्याबाबत सभेमध्ये आग्रही मागणी करण्यात आली.

इथेनॉल वर्ष २०२४-२५ करीता तेल कंपन्याकडून ६ डिसेंबर, २०२४ रोजी प्रसिध्द झालेल्या इथेनॉल निविदामध्ये सहकारी साखर कारखान्यांनी उत्पादीत केलेल्या इथेनॉल पुरवठयाकरीता प्राधान्य देण्यात येणार असल्याचे नमूद केले आहे. खाजगी कारखान्यांकडून उत्पादीत होणारे इथेनॉल तिसऱ्या कमाकाच्या प्राधान्यक्रमाने खरेदी केले जाईल, असे नमूद केले आहे. यास्तव ही बाब खाजगी साखर उद्योगाकरीता मोठ्या संकटाची चाहूल असल्याने याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. याबाबत शासनाकडे निवेदन सादर करून / पाठपुरावा करून अशा प्रकारच्या जाचक अटीमधून सवलत मिळण्यासाठी ‘विस्मा’ने पुढाकार घेवून सदरच्या अटी व शर्ती वगळण्याबाबत आपण प्रयत्न करणार असल्याचे ‘विस्मा’चे अध्यक्ष बी. बी. ठोंबरे यांनी सांगितले. साखर उद्योगाच्या इतरही अनेक ज्वलंत प्रश्नांवर सखोल चर्चा यावेळी करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here