मुंबई : पुढील वर्षी महाराष्ट्रातील इथेनॉलचे उत्पादन १४० कोटी लिटरपर्यंत पोहोचेल असा विश्वास साखर उद्योगाने व्यक्त केला आहे. नॅशनल फेडरेशन ऑफ को-ऑपरेटिव्ह शुगर फॅक्टरिज लिमिटेडचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर यांनी सांगितले की, वाढत्या इथेनॉल उत्पादनामुळे आगामी काळात साखर उद्योगाला ऊर्जा उद्योग असेही म्हटले जाईल. साखर कारखाने इथेनॉल उत्पादनात अग्रेसर आहेत. आणि १ डिसेंबर ते ३० नोव्हेंबर असे याचे उत्पादन चक्र आहे. २०२१-२२ मध्ये महाराष्ट्रात ७८ प्लांटच्या माध्यमातून १००.३६ कोटी लिटर इथेनॉलचे उत्पादन करण्यात आले होते. पुढील वर्षी हे उत्पादन १३० ते १४० कोटी लिटपर्यंत पोहोचू शकते.
राज्यातील इथेनॉल उत्पादनाच्या भविष्यातील वाटचालीबाबत बोलताना दांडेगावकर म्हणाले की, इथेनॉल उत्पादनातील वाढ मुख्यत्वे व्यवहार्यता, नवे तंत्रज्ञान आणि अर्थ तसेच सरकारी धोरणांवर अवलंबून आहे. ते म्हणाले की, सरकारने कामगारांचे वेतन, साखरेच्या दरातील संतुलन टिकवून ठेवले पाहिजे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना चांगला परतावा मिळेल यासाठीही प्रयत्न करण्याची गरज आहे. सरकारने इथेनॉल उत्पादनासाठी आर्थिक मदतही केली पाहिजे अशी मागणी त्यांनी केली. ते म्हणाले, सहकारी साखर उद्योग ‘नो प्रॉफिट-नो लॉस’ या धोरणानुसार काम करतो. त्यामुळे नव्या योजना सुरू करण्यासाठी त्यांना खूप मोठ्या आर्थिक निधीची गरज भासत नाही. सहकार सहकारी साखर कारखाने स्थापन करण्यास मदत करते. अशाच पद्धतीने इथेनॉल उत्पादनातही सरकारने आर्थिक मदत केली पाहिजे.