पुणे : चीनी मंडी
महाराष्ट्रात पुणे, सांगली, सातारा आणि कोल्हापूरला महापुराचा तडाखा बसला आहे. यात शेतीचे आणि विशेषतः ऊस शेतीचे कोट्यवधींचे नुकसान झाले आहे. राज्याच्या कृषी विभागाने आणि साखर आयुक्तालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार आगामी (२०१९-२०) ऊस गाळप हंगामात ८.४३ लाख हेक्टर क्षेत्रातून ५७० लाख टन ऊस गाळपासाठी मिळण्याची शक्यता आहे.
राज्यात सध्या पश्चिम महाराष्ट्रात महापुराने मोठे नुकसान केले आहे. सध्या पुरामुळे ४ लाख ७० हजार नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. पुराने राज्यातील अनेक हेक्टर क्षेत्रातील शेतीला गिळंकृत केले आहे. इतर पिकाप्रमाणे ऊस क्षेत्रातही पाणी घुसल्यामुळे या नगदी पिकाचे खूप मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे आता याचा परिणाम राज्याच्या साखर उत्पादनावर होण्याची शक्यता आहे. यापूर्वीच्या अंदाजानुसार २०१९-२०च्या हंगामात राज्यात ७० ते ७५ लाख टन साखर उत्पादन होण्याची शक्यता होती. परंतु, महापुराच्या तडाख्यामुळे यात १२ ते १५ टक्क्यांनी घट होण्याची शक्यता आहे. गाळपासाठी ऊस कमी उपलब्ध होण्याची शक्यता असल्यामुळे गाळप हंगाम किती दिवस चालेल याविषयी शंका आहे. गाळप हंगाम १६० ऐवजी १३० दिवस होण्याची शक्यता आहे.
महापुरात ऊस पिकाचे नेमके किती नुकसान झाले याची माहिती गोळा करण्याचे काम सध्या सुरू आहे. महापुराचे पाणी उतरल्यानंतर त्याचा कितपत तडाखा बसला याची निश्चित आकडेवारी समजू शकते. तसेच त्याचा साखर उत्पादनावर किती परिणाम होणार याचाही अंदाज येऊ शकतो. उत्पादनात घट झाली तर साखरेच्या किमती वाढण्याची शक्यता आहे. सध्या पश्चिम महाराष्ट्रातील ऊस उत्पादक शेतकरी मानसिक धक्क्यात आले. त्याला यातून सावरण्यासाठी संघर्ष करावा लागणार आहे. सध्या महापुरामुळे दहा हजार कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.