मुंबई : महाराष्ट्रात साखर हंगामाने आता वेग घेतला असून येथील साखर कारखान्यांकडून गतीने ऊस गाळप सुरू आहे. या हंगामात सर्व साखर कारखाने वेळेआधीच सुरू झाल्याने चांगले उत्पादन होत आहे. राज्यातील साखरेचा उतारा १० टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे.
साखर आयुक्तालयाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील सरासरी साखर उतारा १० टक्के आहे. राज्यात तीन फेब्रुवारी २०२१ पर्यंत कार्यरत १८३ साखर कारखान्यांकडून उसाचे गाळप सुरू आहे. राज्यामध्ये आजवर ६६१ लाख टन उसाचे गाळप झाले असून कारखान्यांनी ६६१ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे.
महाराष्ट्रात या हंगामात जादा ऊस उपलब्ध असल्याने आणि वेळेआधीच साखर कारखाने सुरू करण्यात आल्याने गेल्या हंगामाच्या तुलनेत जादा साखर उत्पादन होण्याचा अंदाज आहे.
सध्या सोलापूर विभागात सर्वात जास्त ४१ साखर कारखाने सुरू असून त्यापाठोपाठ कोल्हापूर विभागात ३७ कारखान्यांकडून ऊस गाळप सुरू आहे.