महाराष्ट्राच्या ‘साखर पट्ट्यात’ मविआकडून महायुतीचा दारुण पराभव

कोल्हापूर : 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युतीने राज्याचा ‘साखर पट्टा’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पश्चिम महाराष्ट्रात सहा पैकी पाच जागा जिंकल्या होत्या. 2024 मध्ये मात्र भाजप, शिंदे सेना आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील NCP च्या महायुतीला ‘साखर पट्ट्या’त दारूण पराभवाला सामोरे जावे लागल्याचे दिसत आहे. महायुतीला सहा पैकी चार जागा गमवाव्या लागल्या. दुसरीकडे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, माजी खासदार राजू शेट्टी यानांही दारूण पराभवाला सामोरे जावे लागले. हातकणंगले लोकसभा मतदारसंघात झालेल्या तिहेरी लढतीत शेट्टी तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले. या पराभवाने स्वाभिमानी शेतकरी संघटनेला मोठा धक्का बसला आहे.

पश्चिम महाराष्ट्रात MVA ची निर्विवाद ताकद…

पश्चिम महाराष्ट्रातील कृषी अर्थव्यवस्था प्रामुख्याने उसाच्या नगदी पिकावर अवलंबून आहे आणि या भागावर एकेकाळी काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे एकहाती वर्चस्व होते. तथापि, भाजपने पश्चिम महाराष्ट्रात प्रवेश केला आणि 2019 मध्ये सांगली, सोलापूर आणि माढा लोकसभा मतदारसंघ जिंकले. त्यांचा मित्रपक्ष शिवसेनेने कोल्हापूर आणि हातकणगले जागा जिंकल्या, तर राष्ट्रवादीला फक्त सातारा जिंकता आली होती. यावेळी, MVA – राष्ट्रवादी (शरद पवार गट), शिवसेना (UBT) आणि काँग्रेस आघाडीने राज्यातील ‘साखर पट्ट्यात’ चमकदार कामगिरी केली. कोल्हापूर आणि सोलापूरच्या जागा काँग्रेसने जिंकल्या. पक्षाचे बंडखोर उमेदवार विशाल पाटील यांनी सांगलीचे विद्यमान भाजप खासदार संजय पाटील यांचा पराभव केला. माढा येथेही राष्ट्रवादीने (शरद पवार गट) भाजपचा पराभव केला, तर भाजपला साताऱ्याची जागा प्रथमच जिंकण्यात यश आले.

हातकणंगलेची जागा राखण्यात मुख्यमंत्री शिंदे यांना यश…

एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला हातकणंगलेची जागा राखण्यात यश आले. 2024 च्या लोकसभा निवडणुका पश्चिम विभागासाठी खास होत्या, कारण छत्रपती शिवाजी महाराजांचे दोन वंशज पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात होते. कोल्हापुरातून शाहू छत्रपतींनी काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवली, तर साताऱ्यातून भाजपने उदयनराजे भोसले यांना तिकीट दिले. शाहू छत्रपतींनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या संजय मंडलिक यांचा दीड लाखांहून अधिक मतांनी पराभव केला, तर भोसले यांनी राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) शशिकांत शिंदे यांचा ३२,७७१ मतांनी पराभव केला. सातारा मतदारसंघात पहिले यश मिळूनही, सोलापूरमध्ये भाजपला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले, जेथे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांच्या कन्या काँग्रेसच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांनी भाजपच्या राम सातपुते यांचा ७४,१९७ मतांनी पराभव केला.

अपक्ष लढूनही विशाल पाटील यांचा सांगलीत झेंडा…

माढा लोकसभा मतदारसंघात पक्षांतर्गत तीव्र विरोध असतानाही भाजपने विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनाच उमेदवारी दिली होती. राष्ट्रवादीचे (एससीपी) अध्यक्ष शरद पवार यांनी उमेदवारीवरून भाजपमधील अस्वस्थता हेरून मोर्चेबांधणी केली. त्यांनी भाजपातील धैर्यशील मोहिते-पाटील यांना आपल्या पक्षात प्रवेश देऊन उमेदवारी दिली. याच धैर्यशील मोहिते-पाटील यांनी विद्यमान खासदार निंबाळकर यांचा 1,20,837 मतांनी पराभव केला. सांगलीत काँग्रेस नेते विशाल यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. भाजपचे विद्यमान खासदार संजय पाटील यांच्या विरोधात MVA ने शिवसेनेचे चंद्रहार पाटील यांना उमेदवारी दिली होती. अपक्ष लढूनही विशाल पाटील यांचा सांगलीत विजयाचा झेंडा रोवला.

महायुतीकडून विधानसभा निवडणुकीच्या रणनीतीत होणार बदल…

पश्चिम महाराष्ट्रात MVA झंझावातातही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपली हातकणंगलेची जागा राखण्यात यश मिळवले. विद्यमान खासदार धैर्यशील माने यांनी MVA चे सत्यजित पाटील-सरुडकर यांचा 13,426 मतांनी पराभव केला. माने यांनी शेतकरी नेते माजी खासदार राजू शेट्टी आणि वंचित बहुजन आघाडीचे डी.सी. पाटील यांचाही पराभव केला. राज्यातील लोकसभा निवडणुकीचे निकाल ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत MVA आणि महायुतीसाठी महत्त्वाची भूमिका बजावण्याची शक्यता आहे. पश्चिम महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीतील यशाचा फायदा उठवण्याचा MVA प्रयत्न करेल, तर विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुतीला पुन्हा एकदा फेर राजकीय जुळवाजुळव करावी लागणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here