सोलापूर : करमाळा येथील श्री मकाई सहकारीसाखर कारखान्याच्या थकीत ऊस बीलप्रश्नी जिल्हाधिकारी कार्यालयात आंदोलक व कारखाना प्रशासन यांची शुक्रवारी बैठक झाली. यावेळी कारखान्याचे तत्कालीन अध्यक्ष दिग्विजय बागल व कार्यकारी संचालक हरिश्चंद्र खाटमोडे हे उपस्थित नसल्याने संताप व्यक्त करण्यात आला. येत्या सोमवारी त्यांना उपस्थित राहण्याची सूचना देण्यात आली आहे. तोपर्यंत करमाळा तहसीलसमोर सुरू असलेले आंदोलन स्थगित करण्यात आल्याचे प्रा. रामदास झोळ यांनी सांगितले.
मकाई कारखान्याने शेतकऱ्यांचे गेल्यावर्षीचे ऊस गाळप बिल थकवल्याने शेतकरी आक्रमक झाले आहेत. त्यामुळे तहसील कार्यालयासमोर ‘थू-थू’ आंदोलन करण्यात आले. जोपर्यंत पैसे दिले जात नाहीत तोपर्यंत आंदोलन मागे घेतले जाणार नाही, असा इशारा देण्यात आला होता. मात्र आंदोलनपूर्वीच जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी आंदोलक व कारखाना प्रशासन यांची बैठक बोलावली होती.
या बैठकीला करमाळ्याचे प्रभारी तहसीलदार विजयकुमार जाधव, प्रा. झोळ, ॲड. राहुल सावंत, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रवींद्र गोडगे, शेतकरी कामगार संघर्ष समितीचे दशरथ कांबळे आदी उपस्थित होते. दरम्यान, बैठकीनंतर ‘आदिनाथ’चे माजी अध्यक्ष धनंजय डोंगरे, नवनाथ बागल यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतल्याचे प्रा. झोळ यांनी सांगितले. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी २५ डिसेंबर २०२३ पर्यंत बिले मिळतील, असे सांगितल्यामुळे आंदोलन स्थगित करण्यात आले आहे.