बाजार समितीचे महसूलमंत्र्यांना निवेदन
कोल्हापूर, ता. 3 : कोल्हापूर गुळाची जगभर मागणी आहे. मात्र या गुळला हमीभाव किंवा आधारभूत किंमत मिळत नाही. त्यामुळे गुऱ्हाळघरे बंद होण्याच्या मार्गावर आहेत. यासाठी उसाप्रमाणे गुळालाही हमीभाव मिळावा अशी मागणी बाजार समितीच्यावतीने आज महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली. शासकीय विश्रामगृहात बाजार समितीचे मावळते सभापती कृष्णात पाटील, उपसभापती अमित कांबळे यांच्यासह संचालक मंडळांनी दिले.
निवेदनात म्हटले आहे की, कोल्हापूर गुळाचा जगाला गोडवा आहे. शेतकरी किंवा गूळ उत्पादकांना मात्र हाच गुळ दरा अभावी कडू लागत आहे. आर्थिक अरिष्ठात सापडलेल्या गुऱ्हाळ घरांना सावरण्यासाठी शासनाने गुळाला हमीभाव दिला पाहिजे. गुळाला आधारभूत किंमत देण्यासाठी यापूर्वीही प्रयत्न झाले आहेत. मात्र ठोस निर्णय झालेला नाही. याचा विचार करून शासनाने पुढाकार घेवून हमी भाव ठरविला पाहिजे.
यावर्षीच्या गूळ हंगाम शेतकऱ्यांसाठी चिंताजनक आहे. उसाचे उत्पादन वाढल्याचे कारण पुढे करत गूळाचे दर कमी केले जात आहेत. यावर शासनाने योग्य आणि ठोस निर्णय घ्यावे लागणार आहे. उसाला एफआरपी आहे. गुऱ्हाळा जाणाऱ्या ऊसाला मात्र एफआरपीचा नियम मोडून काढला जातो. याचा विचार झाला पाहिजे. गुळालाही हमीभाव ठरला तर गुऱ्हाळे टिकतील आणि शेतकऱ्यांनाही फायदा होईल. यावेळी, सदस्य, नेताजी पाटील, भगवान काटे, संजय जाधव, तानाजी पाटील, नाथाजी पाटील आदी उपस्थित होते.