अहिल्यानगर : सहकारासमोर खासगीचे नवीन संकट दिवसेंदिवस वाढत आहे. परिणामी आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना आधुनिक बदलांचा वेध घेत येणाऱ्या प्रत्येक अडचणींवर मात करत उस उत्पादक सभासद शेतकरी, संचालक मंडळ, व्यवस्थापन, कामगार आदींच्या सहकार्याने यशस्वी घौडदौड सुरू ठेवली आहे. सभासद शेतकऱ्यांनी उसाचे उत्पादन वाढवून कारखान्याला स्वयंपूर्ण करावे, असे आवाहन कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी केले. कारखान्याच्या ६२ व्या गळीत हंगामाचा प्रारंभ कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे होते.
अध्यक्ष विवेक कोल्हे व रेणुका कोल्हे यांच्या हस्ते गळीत हंगाम प्रारंभ झाला. विवेक कोल्हे म्हणाले, देशात सर्वप्रथम उसाच्या रसापासून थेट इथेनॉल उत्पादन, दैनंदिन गाळपात थेट उपग्रहाचा वापर, सहवीज निर्माती, बायोगॅसपासुन सहवीज, उपग्रहाच्या अभ्यासातून थेट ऊस लागवडीपासून ते तोडणीपर्यंतचे नियोजन, सीएनजी गॅस, पोटॅश खत, मत्स्य संवर्धन, बांबू लागवड, संजीवनी सेंद्रीय खत, अनहैड्राईड, इथाईल अॅसिटेटचे प्रकल्प हे कारखान्याने सुरू केले आहेत. चालू गळीत हंगामात ७ लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे. दत्तात्रय कोल्हे, संजीवनी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष नितीन कोल्हे, डॉ. शिरीष भट, मच्छिंद्र टेके, शिवाजी वक्ते, दीपक गायकवाड, त्र्यंबक परजणे, पांडुरंगशास्त्री शिंदे, संजय होन, राजेंद्र भाकरे, साखर सर व्यवस्थापक शिवाजी दिवटे उपस्थित होते. विश्वास महाले यांनी सूत्रसंचालन केले. मॅनेजिंग डायरेक्टर बाजीराव जी. सुतार यांनी आभार मानले.