सोलापूर : चीनी मंडी
गॅस आणि रॉकेलप्रमाणे साखरेचेही व्यवसायिक आणि घरगुती वापरासाठीचे दोन दर करावेत, अशी मागणी करणारे पत्र पंढरपूर येथील शेतकऱ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठविले आहे. देशात शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळत नसल्यामुळे शेतकरी अडचणीत आले आहेत, असेही पंढरपूर तालुक्यातील आढीव येथील दिनकर आदिनाथ चव्हाण यांनी पत्रात म्हटले आहे. यापूर्वी चव्हाण यांनी साखरेच्या दराबाबत राष्ट्रपतींनाही पत्र पाठविले होते. त्या पत्राची दखल घेऊन राष्ट्रपतींनी पुण्यात साखर आयुक्तालयाला पत्र पाठवून कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
पंतप्रधानांना पाठविण्यात आलेल्या पत्रात म्हटले आहे की, देशातील बाजारात केवळ १५ टक्के साखर घरगुती वापरासाठी घेतली जाते. उर्वरीत ८५ टक्के साखरेचा व्यवसायिक वापर होतो. पण, दोन्ही साखरेचा दर एकच आहे. त्यामुळे टेंडरमधील साखर विक्रीचा दर ४० ते ४५ रुपये करावा आणि उद्योगासाठी १०० रुपये किलो तर घरगुती वापरासाठी ५० रुपये किलो साखरेचा दर करावा, अशी मागणी पत्रात करण्यात आली आहे.
साखर २० रुपये किलो होती तेव्हा चहा पावडर २८ रुपये किलो होती. आता चहाचा दर ३०० रुपयांच्या पुढे केला आहे. पण, साखरेच्या दरात अपेक्षित वाढ झाली नाही. त्यात केवळ ९ ते दहा रुपयांची वाढ झाली आहे. दुसरीकडे इंधनाच्या दरात पाच पट वाढ झाली आहे. ही तफावत चिंतेची बाब आहे. कारण, कोणत्याही उद्योगापेक्षा शेती आणि शेती पूरक उद्योगातून सर्वाधिक रोजगार निर्माण होतो. तोच व्यवसाय हमीभाव मिळत नसल्यामुळे अडचणीत आला आहे. यावर तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी पत्रात आहे.