अहिल्यानगर : देशातील साखर उद्योग आर्थिक अरिष्टात सापडला आहे. उद्योग कोलमडण्याच्या स्थितीत आहे. त्यामुळे हे ध्यानात घेऊन केंद्र शासनाने साखरेचा आधारभूत विक्री दर ४,५०० रुपये प्रती क्विंटल करावा, अशी मागणी माजी आमदार भानुदास मुरकुटे यांनी केली आहे. अशोक साखर कारखान्याचा सन २०२३-२४ च्या गळीत हंगाम सांगता समारंभात मुरकुटे बोलत होते. सध्याच्या साखरेचा उत्पादन खर्च व साखरेला प्रत्यक्ष मिळणाऱ्या दरात सरासरी प्रती टन १,५०० रुपये तफावत आहे. परिणामी कारखान्यांना प्रचंड तोटा सहन करावा लागत आहे. त्यामुळे इथेनॉलसाठी दीर्घकालीन धोरण राबवावे, असे ते म्हणाले.
उसाचा दर २, ७०० ते ३६०० रुपये आहे. तोडणी, वाहतूक खर्च व सरासरी १,३०० रुपये असून उत्पादन खर्च ४,९०० रुपये होतो. मात्र आधारभूत विक्री दर ३,१०० रुपये मिळतो. साखरेला बाजारात ३,४०० रुपये प्रती क्विंटल सरासरी भाव मिळतो. त्यामुळे कारखान्यांना प्रति टन सुमारे १,५०० रुपये तोटा सहन करावा लागतो. ही वस्तुस्थिती ध्यानात घेऊन केंद्राने साखरेची आधारभूत विक्री किंमत प्रति क्विंटल ४,५०० रुपये केली तरच आर्थिक अडचणी दूर होऊ शकतील. यावेळी कारखान्याचे व्हा. चेअरमन पुंजाहरी शिंदे, संचालक सभासद, शेतकरी, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.