नवी दिल्ली : जर तुम्ही आपले पॅन कार्ड (PAN) आधार क्रमांकाशी लिंक केले नसेल, तर ही प्रक्रिया लवकर पूर्ण करा. यासाठीची मुदत ३० जूनपर्यंत आहे. या मुदतीत पॅन क्रमांक आधार कार्डाशी लिंक करण्यासआठी ५०० रुपये शुल्क आकारले जाते. त्यानंतर दुप्पट म्हणजे, १००० रुपये द्यावे लागतील. तुम्ही सहजपणे इन्कम टॅक्स विभागाच्या पोर्टलवर जावून आधार कार्ड पॅनशी जोडू शकता.
याबाबत दैनिक भास्करने दिलेल्या वृत्तानुसार, सद्यस्थितीत ही प्रक्रिया सोपी, सुटसुटीत आहे. यासाठी आधी इन्कमटॅक्स विभागाच्या वेबसाइटवर जावे लागते. यावरील क्विक लिंकमध्ये आधारच्या लिंकवर क्लिक करा. त्यानंतर आपला पॅन तसेच आधार क्रमांक त्यावर लिहून तो व्हॅलिडेट करावा. जर पॅन-आधार लिंक होत नसेल तर तुमच्या पेमेंटसाठी NSDL च्या वेबसाइटवर जावून लिंक पाहावी लागेल. तेथे तुम्हाला CHALLAN NO./ITNS 280 मध्ये प्रोसीडवर क्लिक करावे. नव्याने खुल्या होणाऱ्या पेजवर टॅक्स अॅप्लिकेबल (००२१) Income Tax (Other than Companies)ची निवड करावी लागेल. टाइप ऑफ पेमेंटमध्ये ५०० रुपयांची निवड करून नेट बँकिंग अथवा डेबिट कार्ड या दोन्हीपैकी कोणत्याही पद्धतीने पैसे भरण्याचा पर्याय आहे. ३० जूनपर्यंत यासाठी ५०० रुपये शुल्क आकारणी आहे. त्यानंतर हे शुल्क दुप्पट म्हणजे १००० रुपये भरावे लागेल. शुल्क भरून आधार-पॅन कार्ड लिकिंगची प्रक्रिया चार ते पाच दिवसांची आहे. आधार-पॅन लिंकिंगमधून एनआरआय, भारताची नागरिक नसलेली व्यक्ती, तसेच ८० वर्षावरील व्यक्ती आणि आसाम, मेघालय तथा जम्मू-काश्मीरच्या रहिवाशांना सूट देण्यात आली आहे.