माळेगाव : माळेगाव साखर कारखान्याने यंदा १५ लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे, असे प्रतिपादन कारखान्याचे नवनिर्वाचित अध्यक्ष केशव जगताप यांनी केले. कारखान्याच्या अधिकारी, कामगारांनी अध्यक्ष जगताप, उपाध्यक्ष तानाजी देवकाते यांचा सत्कार केला. सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते. जगताप म्हणाले की, कारखान्याचे अधिकारी, कामगार व सभासदांच्या सहकार्याने संचालक मंडळ राज्यात उच्चांकी दर देत असते. कामगारांचे प्रलंबित प्रश्न सोडविण्यास संचालक मंडळ बांधील आहे. ऊस गाळपाचे उद्दिष्ट सभासद, अधिकारी व कामगारांनी योगदान दिल्यास पूर्णत्वास नेता येईल.
कारखान्याचे उपाध्यक्ष तानाजी देवकाते म्हणाले की, शेतकरी हित जपल्यामुळे माळेगाव कारखान्याचा राज्यात लौकिक झाला आहे. कारखान्याच्या प्रगतीसाठी कामगार अहोरात्र मेहनत घेतील, असे कामगार नेते विनोद तावरे, चंद्रशेखर जगताप, सुरेशबापू देवकाते यांनी सांगितले. यावेळी कामगार नेते तुकाराम जगताप, विनोद तावरे, चंद्रशेखर जगताप, सुरेशबापू देवकाते, लक्ष्मण जगताप, संग्राम चव्हाण, रमेश जगताप, संजय जगताप, सोमनाथ चव्हाण, प्रकाश तावरे, विनोद जाधव, दीपक वाघ, विकास फडतरे, बापूराव कोकरे आदी उपस्थित होते.