पुणे : यंदा ऊस टंचाईचे संकट असले तरीही माळेगाव १५ लाख मेट्रिक टनांचे गाळप केले जाईल, असा विश्वास माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष ॲड. केशव जगताप यांनी व्यक्त केला. राज्याच्या सहकार क्षेत्रातील अग्रेसर असलेल्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याचा ६७ वा बॉयलर अग्निप्रदीपन सोहळा ॲड. केशव जगताप व त्यांच्या पत्नी शांताबाई यांच्या हस्ते पार पडला.
अध्यक्ष ॲड. केशव जगताप म्हणाले की, सभासदांचा उपलब्ध ऊस व गेटकेनधारक यांनी दिलेल्या विश्वासाच्या जोरावर आणि कामगारांच्या सहकार्याने हा हंगाम यशस्वी पार पाडू. यंदा जिल्ह्यात म्हणावा, असा पाऊस पडलेला नसल्याने धरणेही भरलेली नाहीत. पाण्याअभावी अतिशय आव्हानात्मक व खडतर असा गळीत हंगाम आहे. मात्र सर्वांनी एकजुटीने संकटाचा सामना करून गळीत हंगाम यशस्वी करू.
उपाध्यक्ष तानाजी देवकाते यांनी स्वागत केले. सुरेश देवकाते यांनी सूत्रसंचालन केले. बॉयलर प्रदीपन कार्यक्रमाला संचालक बाळासाहेब तावरे, रंजन तावरे, तानाजी कोकरे, मदन देवकाते, संजय काटे, मंगेश जगताप, संगीता कोकरे, विरोधी संचालक रंजन तावरे, सुरेश देवकाते, प्रकाश देवकाते, ज्ञानदेव बुरुंगले, अशोक तावरे, सोपान आटोळे उपस्थित होते. कार्यकारी संचालक अशोक पाटील यांनी आभार मानले.