माळेगाव साखर कारखाना संचालकांमध्ये इथेनॉल प्रकल्पावरून आरोप-प्रत्यारोप

पुणे: शेतकरी सभासदांच्या हितासाठी माळेगाव कारखान्याच्या सत्ताधारी संचालक मंडळाने ५ लाख लीटर क्षमतेचा इथेनॉल निर्मिती प्रकल्प वार्षिक सभेत मांडावा. खुली चर्चा करून सभासदांनी मान्यता दिली, तरच प्रकल्प उभारावा, असे आवाहन विरोधी संचालक चंद्रराव तावरे व रंजन तावरे यांनी पत्रकार परिषदेत सत्ताधारी संचालक मंडळाला केले. तर इतक्या मोठ्या क्षमतेचा प्रकल्प फायद्याचा नाही. विरोधकांनी आडमुठी भूमिका घेऊन सभासदांची दिशाभूल करू नये, असे प्रत्युत्तर माळेगाव कारखान्याचे चेअरमन केशव जगताप यांनी दिले आहे.

कारखान्याच्या सत्ताधारी संचालक मंडळाला २ लाख ४० हजार लीटर क्षमतेचा इथेनॉल निर्मिती प्रकल्प उभारणीसाठी साखर आयुक्तांनी परवानगी दिली आहे. प्रकल्पाच्या विरोधात विरोधी संचालकांनी टीका केली. रंजन तावरे यांनी सांगितले की, सत्ताधारी मनमानी पद्धतीने कारभार करत आहेत. खोटे प्रोसिडिंग लिहिले जात आहे. २ लाख ४० हजार लीटर क्षमतेच्या प्रकल्पासाठी १५० कोटी रुपये खर्च केला जाईल. तर ५ लाख लीटर क्षमतेसाठी १९५ कोटी रुपये खर्च होतील. कमी खर्चात मोठ्या क्षमतेचा प्रकल्प होणार आहे. सत्ताधाऱ्यांनी विशेष वार्षिक सभा घेऊन चर्चा करावी. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या तज्ज्ञ सल्लागार यांची मदत घ्यावी. माजी संचालक चिंतामणी नवले, राजाभाऊ देवकाते, सत्यजित जगताप, अशोक सस्ते, रणजित जगताप, श्याम कोकरे आदी उपस्थित होते.

दरम्यान, या टीकेला सत्ताधारी संचालक मंडळाने प्रत्युत्तर दिले. पत्रकार परिषदेत चेअरमन केशव जगताप यांनी सांगितले की, ५ लाख लीटर क्षमतेच्या प्रकल्पापेक्षा २ लाख ४० हजार लीटर क्षमतेचा प्रकल्प फायदेशीर असल्याचे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या तज्ज्ञ सल्लागारांचे मत आहे. सहकारी साखर कारखाना टिकवण्यासाठी शेतकरी हिताचा विचार करावा लागेल. विरोधकांना सोबत तज्ज्ञ सल्लागार घेऊन चर्चा करण्याची आमची तयारी आहे. या वेळी ज्येष्ठ संचालक बाळासाहेब तावरे, संभाजी होळकर, तानाजी कोकरे, मदन देवकाते, योगेश जगताप, राजेंद्र ढवाण, सुरेश खलाटे, स्वप्निल जगताप, बन्सी आटोळे उपस्थित होते.

साखर उद्योगाच्या, इथेनॉल इंडस्ट्रीच्या बातम्यांबद्दल अधिक वाचण्यासाठी, Chinimandi.com वाचत रहा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here