मंड्या : पाण्याअभावी ऊस पट्ट्यात दुष्काळाची वाढली चिंता

मंड्या : कावेरी खोऱ्यात अपेक्षित पाऊस झाला नसल्याने केआरएस जलाशयात अपेक्षित स्तरापर्यंत पाणीसाठा झालेला नाही. परिणामी कावेरी निरावरी निगम लिमिटेडने (CNNL) मंड्या जिल्ह्यातील मुख्य कालवा विश्वेश्वरैया कालव्यात (VC) पाणी सोडणे बंद केले आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी पाणी सोडावे या मागणीसाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यासह शहरातील सीएनएनएलच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. शेतकऱ्यांकडून निदर्शने केली जात आहेत.
याबाबत द टाइम्स ऑफ इंडियामध्ये प्रकाशित वृत्तानुसार, जिल्ह्यात सद्यस्थितीत ४३,४९५ हेक्टरमध्ये ऊस पिक आहे. पाण्याअभावी हे पिक वाळू लागले आहे. विश्वेश्वरैय्या कालव्यात पाणी सोडण्याचा निर्णय घेणे हे सरकारसाठी कठीण आहे. शेतकरी आपले उभे पिक वाचवणे आणि कोट्यावधी रुपयांच्या नुकसानीपासून बचावासाठी पाण्याची मागणी करीत आहेत.
पाणी पिण्यासाठी आणि कृषी वापरासाठी गरजेचे आहे. ऊस उत्पादक संघाचे अध्यक्ष कुरबुर शांता कुमार यांनी सांगितले की, आम्ही सरकारला शेतकऱ्यांसमवेत अधिकाऱ्यांची चर्चा घडवून आणण्याची मागणी करीत आहोत. शेतकरी आणि सर्वसामान्य जनता यात समन्वय साधला जायला हवा. जर पाणी सोडले गेले तर पुढील काही आठवड्यांसाठी शेतीसंबंधी कामे पूर्ण केली जाऊ शकतात. नंतर अधिकाऱ्यांना पाणी सोडणे मुश्किल होईल.

केआरआरएसचे मंड्या जिल्हाध्यक्ष केम्पेगौडा यांनी सांगितले की, नऊ दिवसांपूर्वी पाणी सोडण्यासाठी आम्ही अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. वारंवार विनंती करूनही अधिकाऱ्यांनी आमच्या मागण्यांना उत्तर दिलेले नाही.

मंड्या जिल्ह्यात ४३,४९५ हेक्टरमध्ये ऊस शेती आहे. मंड्या तालुक्यात ११,६२७ हेक्टरमध्ये ऊस आहे. याशिवाय केआर पेट (१०,६६० हेक्टेर), मद्दूर (९,५२५ हेक्टेर), पांडवपुरा (५,३२५ हेक्टेर) आणि श्रीरंगपट्टणममध्ये (४,२२५ हेक्टेर) असे ऊस पिक आहे. सूत्रांनी सांगितले की, सीएनएनएलने म्हैसूरच्या विभागीय आयुक्तांना कालव्यामध्ये पाणी सोडण्याबाबत निर्देश मागवले आहेत. मेलुकोटेचे आमदार दर्शन पुत्तननैया यांनी सांगितले की, ते पाणी सोडण्याच्या दिशेने काम करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here