धाराशिव : मंगरूळ येथील मांजरा शुगर (कंचेश्वर) कारखान्याने ४ लाख १० हजार टन उसाचे गाळप करून पहिल्याच गळीत हंगाम यशस्वीरित्या पूर्ण केला आहे. सोमवारी (दि. ११) आमदार धीरज देशमुख यांच्या हस्ते गव्हाणीची विधीवत पूजा, सत्यनारायण पूजा करून गळीत हंगामाची सांगता करण्यात आली. कारखान्याने हंगामात २९ फेब्रुवारीअखेर शेतकऱ्यांना उसाचा पहिला हप्ता २,६०० रुपये प्रमाणे बँक खात्यात जमा केला. माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली मांजरा शुगरची वाटचाल सुरू आहे.
यावेळी हंगाम यशस्वीपणे पूर्ण केल्याबद्दल आमदार धीरज देशमुख यांनी सर्व खातेप्रमुख, विभागप्रमुख, कर्मचारी, ऊसतोडणी, वाहतूक मजुरांचे आभार मानले. कार्यक्रमास रेणा कारखान्याचे चेअरमन सर्जेराव मोरे, २१ शुगरचे व्हाईस चेअरमन विजय देशमुख, संत शिरोमणी मारुती महाराज कारखान्याचे चेअरमन श्याम भोसले, व्हाईस चेअरमन सचिन पाटील, विलास शुगर – १ कारखान्याचे व्हाईस चेअरमन रवी काळे, जागृती कारखान्याचे जनरल मॅनेजर गणेश येवले, मांजरा शुगरचे जनरल मॅनेजर सतीश वाकडे, रामानंद कदम, अजित कदम, उत्तम जहायकर, सुंदरराव साळुंखे आदी उपस्थित होते.