छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यातील पाच जिल्ह्यांतील २२ साखर कारखान्यांनी २९ नोव्हेंबरअखेर १६ लाख ६८ हजार ९९७ टन उसाचे गाळप करून ११ लाख २५ हजार ९७९ क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. येथील कारखान्यांचा सरासरी साखर उतारा ६.८७ टक्के इतका राहिला. नंदुरबार, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड या पाच जिल्ह्यांत २२ कारखान ऊस गाळप करीत आहेत. यापैकी १३ सहकारी साखर कारखान्यांनी ८ लाख ६७ हजार ४७७ टन ऊस गाळप करून सरासरी ६.४५ टक्के साखर उतारा मिळवला आहे. एकूण ५ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. खाजगी ९ कारखान्यांनी ८ लाख १ हजार टन उसाचे गाळप करत सरासरी ५ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे.
नंदुरबार जिल्ह्यात दोन कारखान्यांनी १ लाख ३५ हजार ८९१ टन ऊस गाळप करून १ लाख ०१ हजार ४४२ क्विंटल साखर उत्पादन घेतले आहे. जळगाव जिल्ह्यातील २ कारखान्यांनी ६२ हजार ९४८ टन ऊस गाळप करुन ४२ हजार २७५ क्विंटल साखर उत्पादन घेतले आहे. छत्रपती संभाजीनगरमधील सहा कारखान्यांनी ३ लाख ४१हजार ८०३ टन गाळप करुन २ लाख ५८ हजार ४२५ क्विंटल साखर उत्पादीत केली आहे. जालना जिल्ह्यातील पाच कारखान्यांनी ४ लाख ३१ हजार ४७२ टन ऊस गाळप करून ३ लाख २३ हजार ०८५ क्विंटल साखर उत्पादन घेतले आहे. बीडमधील सात कारखान्यांनी ६ लाख ९६ हजार ८८२ टन ऊस गाळप करून ४ लाख २० हजार ७५२ क्विंटल साखर उत्पादित केली आहे.